कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव येथील पालिकेतील पदाधिकारी व अधिकार्यांनी शहरातील सार्वजनिक मुतार्यांचे काम शासन नियमांना हरताळ फासून केले असल्याच...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव येथील पालिकेतील पदाधिकारी व अधिकार्यांनी शहरातील सार्वजनिक मुतार्यांचे काम शासन नियमांना हरताळ फासून केले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकार्यांना पाठविलेल्या निवेदनात या भ्रष्टाचाराच्या विरोधात पालिका कार्यालयासमोर 26 मार्चला सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत आत्मक्लेश सत्याग्रह करणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे पालिका पदाधिकारी व प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
सदर निवेदनात सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी म्हटले आहे की, शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील सार्वजनिक मुतारीची दुरुस्ती व एसी पॅनलिंग बसविण्याचे श्रद्धा मजूर सहकारी संस्था व श्री साईकृष्ण महिला मजूर सहकारी संस्था यांना स्वतंत्रपणे कार्यारंभ आदेश दिले होते. प्रत्येकी 2 लाख 98 हजार 977 रुपये व 2 लाख 98 हजार 701 रुपयांना ही कामे मंजूर करण्यात आली होती. वास्तविक एकाच मुतारीचे हे एक काम होते. या एकाच कामाचे सहा लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले असते तर ई-निविदा काढावी लागली असती. परंतु, मर्जीतील ठेकेदारांना काम देण्याच्या हेतूने मुख्याधिकारी व बांधकाम अभियंता यांनी शासन नियमांना तिलांजली दिली. शिवाय तत्काळ बिलेही काढली.
यानंतर पालिकेचा प्रताप म्हणजे लॉकडाऊन काळात 27 जुलै, 2020 ला वाजत-गाजत या मुतारीचे उद्घाटन केले. तत्पूर्वी 15 डिसेंबरला कार्यादेश, 18 ऑगस्टला स्थायी समितीची मान्यता, 15 ऑक्टोबरला पालिकेची तांत्रिक मंजुरी, 10 नोव्हेंबरला अहमदनगर जिल्हा मजूर सहकारी संस्थेचे शिफारस पत्र आणि त्यानंतर 4 डिसेंबरला मुख्याधिकार्यांनी घाईघाईने निविदा मंजूर केली. 8 डिसेंबरला ठेकेदाराचा करारनामा, 15 डिसेंबरला कार्यादेश आणि 26 फेब्रुवारी, 2021 ला दोन्ही बिले देण्यात आली. यावरुन नगराध्यक्ष, सत्ताधारी व विरोधक मलिद्यासाठी अधिकार्यांसोबत एकवटले असल्याचे दिसून येते. यातून शासन नियमांना सपशेल हरताळ फासले जात असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याने 26 मार्चला याच्या विरोधात पालिका कार्यालयासमोर आत्मक्लेश सत्याग्रह करणार असल्याचे काळे यांनी सांगितले आहे. यामुळे पालिका प्रशासन व पदाधिकार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत