अहमदनगर: प्रतिनिधी ‘हात वारंवार धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीसोबत मनात खंबीरपणा ठेवणे हे चौथे सूत्रही आता करोन...
अहमदनगर: प्रतिनिधी
‘हात वारंवार धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीसोबत मनात खंबीरपणा ठेवणे हे चौथे सूत्रही आता करोना हरविण्यासाठी आवश्यक बनले आहे, भीती आणि मनाचा दुबळेपणा हा करोनापेक्षा भयंकर रोग आहे,’ असे सांगत समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी लोकांना आवाहन केले.
पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने विखे पाटील महाविद्यालयातील वसतिगृहात ४०० बेडचे प्रवरा कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. त्याचे लोकार्पण इंदुरीकर यांच्या हस्ते झाले. मधल्या काळात त्यांच्याविरुद्ध दाखल झालेला एक खटला अलीकडेच रद्द झाला आहे. त्यानंतर त्यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता.
यावेळी इंदुरीकरांनी विखे कुटुंबाचे तोंडभरून कौतुक केले. ‘विखे कुटुंबाच्या रक्तातच सेवाभाव आहे. दैवी शक्तीच त्यांच्याकडून ही समाजसेवा करून घेत आहे. कोविड सेंटरमधून माणुसकीची सेवा करणारे कार्य घडू लागले आहे. कोविड सेंटरमधून रुग्णांच्या चेहऱ्यावर हासू फुलवणे ही सुद्धा एक माणुसकीची सेवा आहे. विखे पाटील परिवाराने सेवेचा हा गुण जोपासत या संकटात केलेले सेवेचे काम हे दैवी शक्तीच्या गुणातूनच होत आहे,’ असे इंदुरीकर म्हणाले.
इंदुरीकरांनी आपल्या खास शैलीत थोडक्यात पण प्रभावी भाषण केले. ‘करोनाच्या संकटाने मानवी जीवन क्षणिक करून टाकले आहे. करोनाच्या संकटामुळेच सर्वांना माणुसकी कळाली. पैसा आणि संपत्तीपेक्षाही माणसाला देव महत्त्वाचा वाटू लागला. रुग्णाला माणसाची आणि समाजाची गरज वाटू लागलीय. त्यामुळं आता आरोग्याची काळजी घेतानाच भीती आणि मनाच्या दुबळेपणाला दूर करावे लागणार आहे. मला करोना होणार नाही हा दृष्टिकोन नव्हे तर मी स्वत:ला करोना होऊ देणार नाही हा दृष्टिकोन आपल्याला ठेवावा लागेल,' असं ते म्हणाले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत