अहमदनगर : यश शेजुळ शास्रात जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक विधी, क्रिया घालून दिलेल्या आहेत, गेल्या अनेक पिढ्यापासून या रूढी, परंपर...
अहमदनगर : यश शेजुळ
शास्रात जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक विधी, क्रिया घालून दिलेल्या आहेत, गेल्या अनेक पिढ्यापासून या रूढी, परंपरा आपण मोठ्या श्रद्धाभावाने पुढे नेत आहोत. मात्र कोरोनाच्या या शापात मृत्यूनंतर आता ना पिंडदान होतंय.. ना कावळ्याची वाट बघितली जातेय.. ना लांबच्या तीर्थावर अस्थीविसर्जन, ना कसल्या विधी होताहेत. तरीही 'आत्मे' बरोबर जीथे जायचे तीथेच जाताहेत का ? की, खरचं पुराणे अडगळीत पडून तुकोबाराय व गाडगे बाबांची वचने खरी ठरतायेत ? याबाबत विचार करण्याची गरज आहे.
कोरोनाने माणूस माणसात ठेवला नाही, हे पहायला मिळत आहे. नातेगोते सगळे विसरून गेले आहेत. जनावरांसारखे जवळची माणसं तडफडून मरत असताना त्यांचे नातेवाईक दुरवर नजर फिरवली तरी कुठं दिसत नाहीत. शेजारचा सोडा अगदी घरातील व्यक्तीला जरी कोरोनाची बाधा झाली तरी रक्ताची लोक स्वतःला त्या प्रिय व्यक्तीपासून दोन हात दूर ठेवत आहेत आणि तेंव्हापासूनच खऱ्याअर्थाने मनोबल खच्चीकरण सुरू होते आणि थेट शववाहिनीवरच ते संपते.
कोरोनाने खरं जग दाखवलं, कुठं आई वडिलांना सोडून बाहेरगावी गेलेल्या मुलाला कोरोना काळात पुन्हा गावची आणि घरचीही दरवाजे बंद केली गेली, कुठं वृद्ध आई-वडिलांच्या मृत्यूसमयी देखील मुलांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली, दोन दिवसांपूर्वीच एका वृद्ध मृताचा मुलगा आणि नातू यांनी अंत्यविधीसाठी येण्यास असमर्थता दर्शवल्याने पारनेरच्या तहसीलदारांनी स्वतः मुखाग्नी दिल्याचें पहायला मिळाले, एवढेच काय तर दररोज सिव्हिलसह अन्य रुग्णालयात रुग्ण मृत झाल्यानंतर अमरधमात मृतदेह नेतेसमयी त्यांचे नातेवाईक देखील उपस्थित राहण्याचा धोका पत्करत नाहीत. त्यामुळे विधी अन अस्थी कलश दूरच्या गोष्टी आहेत एकीकडे जवळचे लोक नाते तोडत आहेत, तर दुसरीकडे काहींनी या आजाराची धंदा मांडला आहे , रेमडेसीविर भेटत नाही, भेटलेचं तर त्यासाठी काळ्याबाजारात 25 ते 30 हजार रुपये मोजावे लागत आहेत. ऑक्सिजनही शिल्लक नाही, बेड भेटत नसल्याने माणसं ऑक्सिजन अभावी मरत आहेत, हे खूप विदारक चित्र आहे. लग्न सोहळे आणि अंत्यविधीसाठी देखील बंधने आली आहेत. मृत्यूनंतर मृतदेह ताब्यात दिला जात नाही, त्यामुळे विधी देखील नगरच्या अमरधमात चार-चौघात करावे लागत आहेत, एकाच वेळी 50-50 सरण रचले जात आहेत. यात अनेक मृतांचे नातेवाईकच पळपुटेपणा दाखवत असल्याने विशेषतः शहरी भागात ना सावडण्याची क्रिया, ना दशक्रिया विधीचे सोपस्कार, ना तेरावा विधी केला जात आहे, ग्रामीण भागात अजून हे विधी सुरू आहेत, हे समाधान आहे. मात्र, शहरात ना पिंडदान होतंय, ना कावळ्याची वाट पाहिली जाते, ना तीर्थक्षेत्र ठिकाणी अस्थीविसर्जन केलं जातं, त्यामुळे खऱ्या अर्थाने आज रूढी परंपरावर देखील गदा येऊन पितृदोष भीती मानगुटीवर कायम आहे, मात्र, यात एक प्रश्न नक्कीच पडतो तो म्हणजे आज माणसं मेल्यानंतर अनेक विधी होत नाहीत किंबहुना गुरू नसल्याने किंवा नातेवाईक घाबरत असल्याने ते विधी घडत नाही, तरीही मृत व्यक्तीचे आत्मे बरोबर जायचे तिथे जातातच ना ? त्यामुळे संत गाडगे बाबा सांगतात तसे माणूस मेल्यानंतर त्याच्या आठवणीत रडण्यापेक्षा तो जित्या असताना त्याला मदत करा, माणसात देव शोधा, अगदी तसेच काही डॉक्टर, पोलीस , महसूल प्रशासनाचे लोकं आपल्या कर्तव्यातून माणसात देव शोधताना दिसत आहे, अनेक घटकात कोरोना योद्धे देवदूत बनून मदतीला धावून येत आहेत, त्यांनी रुग्णांना दिलेले जीवदान हेच खऱ्या अर्थाने माणुसकीचे प्रतीक आहे. एकवेळ विधी हुकले तरी चालतील मात्र एक नागरिक म्हणून कर्तव्य बजावताना पळपुटेपणा नकोय, असे घडल्यास माणसात नक्कीच देव सापडेल आणि प्रत्येकाने जबाबदारीने एकमेकांना मदत केली तर मृत्यूनंतर मोक्ष मिळेल की नाही माहिती नाही, मात्र जिवंतपणे ते समाधान नक्की मिळेल ..!


कोणत्याही टिप्पण्या नाहीत