कोपरगाव/प्रतिनिधी शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोविडचे संक्रमण होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि व्यापाऱ्यांनी बैठक घे...
कोपरगाव/प्रतिनिधी
शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोविडचे संक्रमण होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि व्यापाऱ्यांनी बैठक घेत शुक्रवारपासून (ता.१६) ते सोमवारपर्यंत (ता.१९) जनता कर्फ्यू घोषित केला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी देखील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कार्यालय, किराणा दुकान, गोडावून, हार्डवेअर दुकान पालिकेने सात दिवसांसाठी सील करून कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात कोविड विषाणूंनी अक्षरशः कहर केला आहे. राहाता, संगमनेर, अकोले, कोपरगाव कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. दिवसेंदिवस वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने कलम १४४ अंतर्गत संचारबंदी घोषित करून कडक अंमलबजावणीचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तरी देखील काही नागरिक आणि व्यावसायिक नियम धाब्यावर बसवत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि व्यापाऱ्यांनी घोषित केलेल्या जनता कर्फ्यूमध्ये काही बेफिकीर व्यावसायिकांनी सेवा चालू ठेवल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, विशाल भागवत, रणजीत तांबे, योगेश खैरे, रवि वाल्हेकर यांनी शहरातील कार्यालय, किराणा दुकान, गोडावून आणि हार्डवेअर दुकान सात दिवसांसाठी सील केले आहे. या धडक कारवाईने व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत