देवळाली प्रवरा राजेंद्र उंडे पत्रकारांसाठी भारत हा देश धोकादायक असल्याचे मत एका जागतिक संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतासा...
देवळाली प्रवरा राजेंद्र उंडे
पत्रकारांसाठी भारत हा देश धोकादायक असल्याचे मत एका जागतिक संस्थेच्या अहवालातनमूद करण्यात आले आहे. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात वृत्तपत्र स्वातंत्र्याची कायम होणारी गळचेपी ही बाब चिंताजनक असून चौथ्या स्तंभाच्या रक्षणासाठी आता देशातील लोकशाहीप्रेमी जनतेने पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
श्री. एस.एम. देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, कोणी विश्वास ठेवा अथवा ठेवू नका, पण वास्तव हे आहे की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हा पत्रकारांसाठी धोकादायक देश आहे.हे आम्ही म्हणत नाही आहोत; तर पत्रकारांसाठी ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालणाऱ्या वॉशिंग्टन येथील ‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर’ या जागतिक संस्थेच्या अहवालात (वर्ल्ड प्रेस फ्रिडम इन्डेक्स-२०२१) हे वास्तव नमुद केलं गेलं आहे.
भारतातील ‘प्रेस फ्रिडम’ वगैरे बाबी बकवास असल्याचे पुन्हा दिसून आलं आहे. ‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर’ या संस्थेने जगातील १८० देशातील पत्रकार आणि पत्रकारितेच्या स्थितीची माहिती घेऊन हा अहवाल तयार केलाय. त्यात पत्रकारितेसाठी जगातील जे वाईट देश आहेत त्यात भारताचा समावेश होत असल्याचे संस्थेच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे. भारत १४२ व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी देखील भारताचे स्थान १४२ वे होते. ते कायम ठेवले म्हणून कोणी पाठ थोपटून घेऊ नये. कारण गतवर्षीच्या तुलनेत यंदा घसरण झालेली नसली तरी २०१६ मध्ये भारत १३३ व्या स्थानावर होता याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. नरेंद्र मोदींची देशात हुकूमत सुरू झाल्यानंतर भारत १३३ वरून १४२ पर्यंत घसरला आहे. चीनची अवस्था आपल्यापेक्षा फारच वाईट आहे. चीन १७७ व्या स्थानावर आहे. पण चीनमध्ये माध्यमांवर कठोर निर्बंध आहेत. शिवाय वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या तिकडे कोणी गप्पा मारत नाही. चीननंतर तुर्कस्थान १७८ व्या स्थानावर, उत्तर कोरिया १७९ व्या स्थानावर आहे; तर इरिटेइआ हा देश सर्वात तळाला आहे. ज्या देशात वृत्तपत्र स्वातंत्र्याची बुज राखली जाते त्यात नॉर्वे टॉपवर आहे. त्यानंतर फिनलँड, डेन्मार्कचा नंबर लागतो. भारतात पत्रकारांना मुक्तपणे आपले काम करता येत नाही. विविध स्वरूपाचे दबाव आणले जातात.
पत्रकारांवर होणारे हल्ले, पत्रकारांवर खोटे खटले दाखल करून त्यांच्या आवळल्या जाणाऱ्या मुसक्या, नोकऱ्यांवर गंडांतर, अशा घटना भारतात सर्रास घडताना दिसतात. पत्रकारांचे आरोग्य आणि अन्य सोयी – सवलती देण्याबाबत सरकारकडून दाखविली जाणारी उदासीनता ही बाब देखील चिंता वाढविणारी आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतात असल्याचा टेंभा आपण कायम मिरवत
असतो; मात्र या लोकशाहीप्रधान देशात वृत्तपत्र स्वातंत्र्याची कायम गळचेपी होत असल्याची बाब चिंताजनक असल्याचे मत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे. चौथ्या स्तंभाच्या रक्षणासाठी आता देशातील लोकशाही प्रेमी जनतेनं पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहनही एस.एम.देशमुख यांनी केलं आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत