कोपरगाव/प्रतिनिधी जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. रोज रुग्णसंख्या नवनवे विक्रम रचत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलम...
कोपरगाव/प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. रोज रुग्णसंख्या नवनवे विक्रम रचत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. रुग्ण दाखल करण्यासाठी खाट, प्राणवायू आणि रेमडेसिवीर मिळणे मुश्किल होत आहे. तरी देखील नागरिकांना गांभीर्य नसून विविध कारणांच्या नावाखाली मुक्त संचार करत आहे. याची जिल्हा प्रशासनाने गंभीरतेने दखल घेऊन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरावर नियमांचे पालन करण्याच्या आवाहनासाठी सोमवारी (ता.१९) पोलिसांचा 'रुट मार्च' काढण्यात आला.
नगर, संगमनेर, राहाता, अकोलेसह कोपरगावमध्येही रोज बाधितांच्या संख्येत उच्चांकी भर पडत आहे. सरकारच्या आदेशानुसार संचारबंदीची कडक अंमलबजावणी प्रशासन करत असतानाही बेफिकीर नागरिक मुक्त संचार करताना आढळून येत आहे. याची जिल्हा प्रशासनाने गंभीरतेने दखल घेतली असून, पोलिसांना अधिक कठोर कारवाई करण्यास सूचित केले आहे. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरावर रुट मार्च काढण्यात आला. कोपरगावमध्ये काढण्यात आलेल्या रुट मार्चमध्ये चारचाकी व दुचाकी वाहनांद्वारे शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, दौलत जाधव आदिंसह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांनी कोविड नियमांचे तंतोतंत पालन करून हा लढा यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत