अहमदनगर : सचिन शेजुळ गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोना संकटाशी लढत आहे. याचे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर तीव्र पडसाद उमटलेल...
अहमदनगर : सचिन शेजुळ
गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोना संकटाशी लढत आहे. याचे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर तीव्र पडसाद उमटलेले आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडत आहे, अगदी गॅस सिलिंडरच्या भावाबरोबरच भाजीपाला, किराणा दरवाढिने थेट किचनपर्यंत याची झळ सर्वसामान्य जनतेला पोहचताना दिसत आहे. विशेष, म्हणजे उद्योग, व्यवसाय बंद, मायबाप सरकारची मदत नाही,त्यात सेन्सेक्सप्रमाणे दररोज उसळी मारणारी महागाई यामुळे जगायचं कस हा प्रश्न असतानाच त्यात कोरोनाचे मानगुटीवर बसलेलं भूत फकत विचारानं देखील जगणे मुश्किल करत आहेत. कोरोना झाल्यास उपचारासाठी हॉस्पिटल बेडसाठी वाढीव मोजावे लागणारे पैसे, ऑक्सिजन सुविधेसाठी लाखोंचा ऍडव्हान्स, काळाबाजारातील रेमडीसीवर आणि हे सर्व करून वाचलं तर ठीकच अन्यथा, मृत्यूनंतर लागणार कफन व अंत्यविधीचं सरपन देखील महागल्याने 'जगणं' आणि 'मरणं' देखील आता भलतेच 'महाग' झाल्याचे दिसत आहे.मार्च 2020 मध्ये देशात लॉकडाऊन लादण्यात आला. त्यानंतर नगर जिल्ह्यात हा दुसरा लॉकडाऊन सुरू झाला आहे. अचानक तीव्र झालेल्या या संकटाने जनता गोंधळून गेली आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. छोट्या व्यावसायिकांची आणि असंघटित क्षेत्रात काम करणार्यांची अवस्था तर फारचं बिकट झाली आहे. त्यात वाढत्या महागाईने लोकांना रडवले आहे. अगोदरच उद्योग धंदे बंद आहेत, दुकानांना भाडे, वीजबिल मात्र सुरूच आहे, कर्जाच्या वसुलीचे तगादेही झोप उडवत आहेत, उत्पन्न बंद असल्याने रात्री खायचं काय ? याचे वांधे आहेत, त्यात कोरोनाची भीती ! दुर्दैवाने कोरोना झाल्याच तर विचारूच नका. पैसे आणायचे कुुठून, यात रुग्णवाहिकाचे मनमानी भाव वाढले आहेत, शासकीय रुग्णालयात बेड मिळत नाही, तेथे कार्यकर्त्यांनाच 'भाव' मिळतो, कोव्हिडं सेंटरवरही ' शिफारस' लागते, कुठं बेड मिळालीच तर ऑक्सिजन नाही, रेमडीसीवर तर मिळतच नाही आणि ब्लॅकने घेतलं तर 20 हजारांच्या पुढे रक्कम खिशात असावी लागते, याशिवाय अन्य महागलेल्या औषध उपचारासाठी मोठी तरतूद करावी लागते. शिवाय यातून जगले तर ठीक नाही तर अंत्यविधीसाठी सरपण देखील आता महाग होऊन बसले आहे. आशा प्रकारे कोरोनात ज्याने त्याने महागाईला पायघडी टाकून धंदे मांडले आहेत व यात गोरगरीब भरडून गेले आहेत. या वाढती महागाईने मोठा कळसच केला आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेल तेलाच्या किमंती शतकाकडे वाटचाल करत असताना सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. शिवाय, गॅसच्या किंमतीतही झपाट्याने वाढ झाली आहे.
प्रधानमंत्री मोदी यांनी उज्ज्वला गॅस योजना सुरू करून त्याअंतर्गत घराघरात गॅस सिलिंडरचे वितरण केले. मात्र एका वर्षात गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. 14.20 किलो विनाअनुदानित गॅस सिलिंडर्सची किंमत दिल्लीत 809 रुपये, कोलकातामध्ये 835.50 रुपये, मुंबईत 809 रुपये आणि चेन्नईमध्ये 825 रुपये व नगरमध्ये (राहुरी) 870 रुपये इतकी वाढली आहे. तर, गेल्या वर्षी मे 2020 मध्ये एलपीजी सिलिंडर सरासरी 580 रुपये दराने मिळत होता. मध्यतरी, गॅस किमतीत थोडीफार कपात झाली होती, मात्र, डिसेंबरपासून गॅस किमतीचा पुन्हा भडका उडाला. डिसेंबरमध्ये किंमत 50-50 रुपयांनी वाढली आणि ती 694 रुपयांच्या पातळीवर गेली. फेब्रुवारीमध्ये किंमत तीन वेळा वाढली आणि 794 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. मार्चमध्ये ती 819 रुपयांवर पोहोचली जी एप्रिलपर्यंत होती. मे महिन्यात या किमतीत आणखी वाढ होऊन गॅस टाकीसाठी आता तब्बल 870 रुपये मोजावे लागत आहेत.
दरम्यान, एकीकडे गॅस महागला असताना दुसरीकडे खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्या. गेल्या एका वर्षात यात 55 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. सरकारी अहवालानुसार किरकोळ तेलाची किंमत 170 रुपयांच्या पुढे गेली आहे. गेल्या वर्षी मेच्या तुलनेत सरासरी 50 रुपये वाढ झाल्याचे दिसत आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन तेलाची किंमतही वाढल्या आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी मे 2019 मध्ये शेंगदाणा तेलाची किंमत 95 रुपये किलो होती, जी आता 180 च्या पातळीवर गेली. सूर्यफूल तेल 100 रुपयांच्या तुलनेत 190 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. सोयाबीन तेल देखील 180 रुपयांच्या आसपास विकले जात आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन आणि मालाचे शोर्टजच्या नावाखाली ग्रामीण भागात हे दर फुगलेलेच दिसतील. याचबरोबर सर्व डाळी देखील महागल्या आहेत. यात मूग डाळ 105-110 रुपये किलो झाली आहे, तूर डाळ 110, हरभरा डाळ 70 रुपये किलो विकली जात आहे. भाजीपाला देखील महागला आहे, बटाटे खुल्या बाजारात 25- 30 रुपये किलो, मिरची 80 , वांगे 40, गवार 60, पालक 15 जुडी, मेथी 30 रुपये जुडी असे ग्रामीण व शहरी भागात वेगवेगळे भाव दिसत आहेत. अंडे आणि चिकन देखील महागले आहे, असो, अगोदरच आर्थिक अडचण असताना अशी महागाई 'आहे ते खिशे मोकळे करणारी बनली आहे. उसनवारी बंद झाली आहे, अक्षरशः या महागाईने अनेक हातावरील कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. कधी एकदा लॉकडाऊन उठेल आणि उद्योग धंद्याचे चाक फिरेल व विस्कटलेली घडी पूर्वपदावर येईल, याकडे नगरकर डोळे लावून आहेत, मात्र आता लॉकडाऊन पुन्हा वाढला आहे, महागाईच्या या झळात सर्वसामान्य जनता पुन्हा काही दिवस होरपळणार आहे. त्यासाठी शासनाने आता सर्वसामान्य जनतेसाठी आधार देणारे मोठे पॅकेज देण्याची गरज निर्माण झाली आहे अन्यथा पुन्हा बेरोजगार , व्यापाऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, यातून पुढे गुन्हेगारीही वाढणार आहे, हे नक्की .
लसीकरण आहे पण लस नाही, हॉस्पिटल आहेत पण बेड नाही, बेड आहे तर ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोकं आहेत पण नोकरी नाही, मनकी बात आहे, पण मनातील नाही, मुख्यमंत्री आहेत, पण रस्त्यावर उतरत नाही, लोकप्रतिनिधी आहेत, मात्र सर्वच कामाचे नाहीत, झेडपी, पंचायत समिती सदस्य आहेत, पण नॉटरीचेबेल दिसतायेत, डरकाळ्या फोडणारी संघटना आहे, पण 'धनुष्य' म्यानात आहे, तर पारनेर वगळता घड्याळाची टिकटिक कुठं ऐकायला मिळत नाही, संगमनेर सोडून अन्यत्र मदतीचा 'हात' कुठंच पुढं येताना दिसत नाही तर 'कमळ' देखील फकत प्रवरेतच फुलताना दिसतंय ! अशी विदारक स्थिती पहायला मिळत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत