जिल्ह्यातील 'ती' 1300 कुटुंबे वाऱ्यावर ; लोकप्रतिनिधींनाचं 'जबाबदारीचा' विसर ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जिल्ह्यातील 'ती' 1300 कुटुंबे वाऱ्यावर ; लोकप्रतिनिधींनाचं 'जबाबदारीचा' विसर !

 अहमदनगर: सचिन शेजुळ    चीनच्या कोरोना ड्रॅगनने जगात हाहाकार माजवला असताना देशातही अनेक घरं उध्वस्त केले आहेत. आपल्या नगर जिल्ह्यातही दर...

 अहमदनगर: सचिन शेजुळ   


चीनच्या कोरोना ड्रॅगनने जगात हाहाकार माजवला असताना देशातही अनेक घरं उध्वस्त केले आहेत. आपल्या नगर जिल्ह्यातही दररोज सरासरी 20 मृत्यू सुरू असून आतापर्यंत तब्बल 1300 पेक्षा अधिक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. एकीकडे शासकीय कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला मदतीची घोषणा केली जाते, मात्र दुसरीकडे जगाचा पोशिंदा असलेला आमच्या गोरगरीब शेतकरी, शेतमजूर जीवाची पर्वा न करता धान्य पिकवताना बाधित होऊन धारातीर्थी पडतो, ग्रामीण भागातील छोटा व्यवसायिक,  बलुतेदार हा पारंपरिक समाजसेवेची धडपड करता करता बाधित होऊन मरतो, तरुणवर्ग रोजगार नसल्याने नाईलाजाने आत्महत्या करतोय, अशा प्रकारे कोरोनात अनेक कुटुंबातील कर्तेधर्त्ये गेल्याने या कुटुंबाना देखील खऱ्याअर्थाने आज आधाराची गरज आहे, मात्र दुर्दैवाने 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' हे धडे गिरवणाऱ्या लोकप्रतिनिधीनाचं 'माझा मतदारसंघ, माझी जबाबदारी' याचा पुरता विसर पडला आहे. वास्तविकत:  आपल्या मतदार संघातील जनतेला आपण वेळेवर उपचार देऊ शकलो नाही, लोकप्रतिनिधी या नात्याने तशी व्यवस्था करू शकलो नाही, त्यामुळे शेकडो लोक दगावली आहेत, त्यांना वाचविण्यात आलेले आपले हे अपयश स्वीकारून किमान त्या मतदारांच्या मृत्यूनंतर तरी  प्रत्येक आमदारांनी मोठ्या मनाने व उदार अंतकरणाने  'या' कुटुंबाचे पालकत्व घेतल्यास नक्कीच राज्यातच नव्हे तर देशात नगरच्या या कर्तृत्ववान लोकप्रतिनिधीची नावे पुढे येणार आहे.   

 
       नगर जिल्हा हा नेहमीच सर्व क्षेत्रात आघाडीवर राहिलेला आहे. सहकार असो की राजकारण येथील मातब्बर नेत्यांनी नगरची वेगळीच छाप सोडलेली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखे राज्याचे नेतृत्व करू शकणारे मोठे नेते येथे आहेत,  मंत्री शकररावं गडाख, मंत्री प्राजक्त तनपुरे हे मंत्रिमंडळात चांगल्या खात्यांचे प्रतिनिधित्व करत आहेत, यांच्यासह निलेश लके, रोहित पवार, आशुतोष काळे, संग्राम जगताप, किरण लहामते, लहू कानडे, मोनिका राजळे तसेच जेष्ठ नेते बबनराव पाचपुते यांच्यासारखे लोकप्रतिनिधी पुर्वपुण्याईनेच जिल्ह्याला लाभले आहेत.                    कोरोना काळात यातील अनेक आमदारांनी रस्त्यावर उतरून जनतेसाठी कामे केली आहेत. कोव्हिडं सेंटर, कोरोना चाचण्या, ऑक्सिजन बेड, रेमडीसीवर यासाठी लोकप्रतिनिधीनी  बरे वाईट प्रयत्न केल्याचे पहायला मिळाले. यात, जिल्ह्याधिकाऱ्यांची प्रशासकीय यंत्रणा देखील कुठंच मागे नाही, मात्र दुर्दैवाने प्रयत्न करूनही नगरमध्ये कोरोनाने तांडव केलेच, अगदी अलीकडे प्रशासन देखील याकामी अपुरे पडल्याचे नाकारून चालणार नाही. रुग्णांच्या चाचण्या वेळेत झाल्या नाहीत, किंबहुना किट उपलब्ध झाले नाहीत, त्यामुळे कोरोना निदान लवकर होऊ शकले नाही, परिणामी उपचाराला उशीर झाला, रुग्ण वाढत गेले, त्याच्यामुळे रुग्णाची बेड, औषध व्यवस्था करण्यात प्रशासन कमी पडले, इत्यादी कारणांमुळे रुग्णसंख्या व मृत्युदर देखील वाढला आहे. याशिवाय, रेमडीसीवरचा काळाबाजार झाल्याच्या अनेक घटना पुढे आल्या, सिव्हीलमध्ये अनेकांनी उपचाराअभवी जीव सोडला, कुणाला ऑक्सिजन मिळाला नाही, तर कुणाकडे उपचारासाठी पैसे नसल्याने जीव गमवावे लागले, खासगी हॉस्पिटलवरील नियंत्रण निसटले व रुग्णांची प्रचंड लूटमार सुरू झाली, ऑक्सिजन बेड ब्लॅकने बुक होऊ लागल्या. असे महागडे उपचार घेणं धनदांडग्याचं ठीक आहे, पण दररोज हातावर पोट असलेल्या मजुराने, व्यवसायिकाने धंदे बंद असताना एवढे पैसे कुठून आणायचे?  आयुष्यभर काबाडकष्ट करूनही स्वतःला नवं कापड घेऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांने काय करायचं ?  असे प्रश्न तोंडवासून उभे असताना नातेवाईकांनी जमिनीचा आणखी एक तुकडा गहाण ठेऊन  आपल्या प्रिय व्यक्तीवर उपचार केल्याचे पाहिले आहे, अनुभवले आहे, तर काही मायमाऊलींनी मंगळसूत्र मोडून पै पै गोळा करत धन्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे हदय हेलवणारे दृश्य दिसून आले आहे. आता एवढे होऊनही यात काही वाचले, तर दुर्दैवाने काही गेलेचं..!  अर्थात, जे वाचले ते लाखो रुपये खर्च करून वाचले आहेत, तो कर्जाचा डोंगर वर्ष उलटत आले तरी जगूनही त्यांना अस्वस्थ करणाराचं आहे, आणि जे खर्च करूनही गेले त्यांचं काय..? ते तर संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहेत, कर्जाचा बोजा डोक्यावर आहेच, 10 दिवस होत नाही तोच तगादेही सुरू होऊन राहिलेल्या जमिनीवर वक्रदृष्टी
पडली आहे.  कुटुंबाचा आधार गेल्याने हजारो कुटुंबासमोर  गडद अंधार पसरला आहे, यातून ते कुटुंब कधी सावरेल की नाही, माहिती नाही, मात्र त्यांना खरी आधाराची गरज आहे.                                जिल्ह्यात आजही सरासरी दररोज 3 हजार रुग्ण वाढत आहेत, तर दररोज 20 पेक्षा अधिक मृत्यू होत आहेत, मृतांच्या गावासह आकड्याबाबत संशय कायम आहे. या कोरोनाने कुणाच्या डोक्यावरील वडिलांचे छत हिरावले, कुणाची मायेचा आधार असलेली माऊली नेली, कुणाचे बंधू, कुणाची अर्धांगिनी तर कुणी पोटचे पोरं देखील जाताना डोळ्यांनी पाहिले आहेत. या कुटुंबाला आधार देताना लोकप्रतिनिधीची भूमिका मोलाची ठरणारी आहे. कोरोनाने मृत झालेल्या कुटुंबाला देखील शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे मदत द्यावी, अशी अपेक्षा आहे. कदाचित हे शक्य न झाल्यास किमान त्या कुटुंबातील विधवा महिलेला पोटपूरती पेन्शन सुरू करावी, मुलांच्या शिक्षणासाठी दत्तक-पालक योजना हाती घ्यावी, मुलींच्या लग्नासाठी कन्यादान योजनेतून आधार द्यावा, आरोग्य सेवा मोफत देणारी योजना सुरू करावी, आणि सावकारी, राष्ट्रीयकृत बँकांचे सर्व कर्ज माफ करून या कुटुंबाला पुन्हा प्रवाहात आणावे लागणार आहे. याबाबत शासन कधी निर्णय घेईल माहिती नाही मात्र स्थानिक आमदारांनी आपल्या मतदार संघातील जनतेविषयी पुतण्या मावशीचे प्रेम दाखविंण्यापेक्षा 'माझा मतदार संघ, माझी जबाबदारी' स्वीकारून तत्काळ याबाबत भूमिका जाहीर करणे गरजेचे आहे. तसेच, विधानसभेला पराभूत झालेले आणि पुन्हा जोर बैठका काढून तयारीत असलेल्या राजकारण्यांनी, समाजातील दानशूर व्यक्तीनी, सामाजिक संघटना यांनीही याकामी मदतीचा हात देऊन रक्कम उभी केल्यास हा देखील एक आदर्श उभा राहणार आहे, शिक्षक संघटना निधी जमा करत असल्याने त्यांचेही कौतुक करावे तितके थोडे आहे. आशा प्रकारे मदतीचा निर्णय झाला तरच खऱ्या अर्थाने कोरोनात मृत झालेल्या आपल्या बांधवांसाठी माणुसकीची ही खरी श्रद्धांजली ठरेल.   

खा. सुजय विखे यांनी माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनात काही वर्षांपूर्वी शासनाच्या मदतीवर विसंबून न राहता शेकडो शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आपल्या हिमतीवर दत्तक घेऊन देशाला मोठा संदेश दिला होता. विखे कुटुंबाचा आधार मिळाल्याने ही कुटुंबे सावरली होती, आज पुन्हा अशा दाततृत्वाची नगर जिल्ह्याला गरज आहे. प्रत्येक तालुक्यात साधारणतः 100 कुटुंबे कोरोनाने उघडी पडली आहेत, त्यांच्यासाठी कुणीतरी पुढे येण्याची गरज आहे. आता जिल्ह्यातील 12 आमदार व त्यातील तीन मंत्री काय निर्णय घेतात, याकडे लक्ष आहे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत