कोरोनात जनता वाऱ्यावर ' अकोले : प्रतिनिधी
कोरोनात जनता वाऱ्यावर'
अकोले : प्रतिनिधी
आढळा विभागात कोरोनाचा हाहाकार उडाला आहे.नागरिक हैराण झाले आहेत,जनता मृत्यूच्या जाळ्यात अडकली असून आढळा विभागावर राजकीय पोळ्या भाजून घेणाऱ्या विद्यमान आमदारांनी व तालुक्यातील नेत्यांनी मात्र आंधळेपणाचे सोंग घेतले आहे,आपल्या या दुटप्पी वागणुकीमुळे आपली माणुसकी दिसून आली भविष्य काळात येणाऱ्या राजकीय घटनांमध्ये या परिसरातील जनता आपणास जाब विचारल्याशिवाय राहाणार नाही.
आढळा परिसरात कोरोनाचा हाहाकार उडाला असून नागरिक हतबल झाले असताना मा.आमदार वैभवराव पिचड व रावसाहेब वाकचौरे यांनी समशेरपूर येथे कोविड सेंटर सुरू केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.या व्यतिरिक्त तालुक्यातील विविध संस्थांवर पदे भूषविणारे,जिल्ह्याच्या राजकारणात वरचष्मा असणाऱ्या नेत्यांनी आढळा परिसराकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला आहे.आढळा विभागातील नागरिकांची मते निवडणुकीच्या वेळी यांना चालतात,जिल्ह्याच्या राजकारणासाठी विविध संस्थांचे ठराव लागतात,तालुक्यातील विविध शिखर संस्थांच्या मतदानासाठी मतदार म्हणून लागतात,पंचायत समिती व जिल्हा परिषदेला मतदार म्हणून जनता लागते आणि आमदारकीच्या निवडणुकीत नागरिकांना वेठीस धरले जाते ,त्यावेळी जनतेला केंद्रभूत मानून जनतेच्या विकासासाठी अव्वाच्या सव्वा गप्पा मारणारे हे नेते अडचणीच्या काळात कोणत्या बिळात जाऊन बसले कुणास ठाऊक.
आढळा परिसरात बिताक्यापासून ते गणोरेपर्यंत सर्वच गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे.ज्या त्या गावातील जागृत नागरिक रुग्णांची काळजी घेण्याचे काम करत आहेत आढळा परिसराच्या मदतीसाठी समशेरपूर येथे कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी मा.आमदार वैभवराव पिचड व रावसाहेब वाकचौरे यांनी केली.१०० बेडचे कोविड सेंटर व १० बेड चे ऑक्सिजन युक्त बेडची उभारणी करून जनतेला थोडासा का होईना आधार दिला.अकोले तालुक्यात दोन-तीन ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आले. तेथील प्रकार जनतेने अनुभवले असे असतानाही लाखो रुपयांची मदत तालुक्यातील नेत्यांनी त्या ठिकाणी केली ,अनेकांनी पोपटपंची करत श्रेय घेण्याचा प्रयत्नही सुरु केला आहे, मात्र आढळा विभागाचा या नेत्यांना पूर्णपणे विसर पडला आहे.
राजकारणासाठी आढळातील जनतेचा आणि नेत्यांचा फक्त वापर करायचा. निवडणुकांपूरते आभाळभर आश्वासने द्यायची, एकदा की आपले काम झाले की दुर्लक्ष करायचे, ही भूमिका नेहेमीच तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी आढळा विभागाबाबत घेतली आहे.
तालुक्यातील प्रमुख नेत्यांच्या पतसंस्था समशेरपूर या ठिकाणी आहेत, या त्या पतसंस्थांमध्ये या विभागातील शेतकऱ्यांच्या ठेवी आहेत, कर्जही घेतलेले आहे, त्यातून मिळणारे कोट्यवधींचा आर्थिक नफा या संस्थापकांना मिळतो. मग या विभागातील जनतेच्या जिवावावर धनदांडगे झालेल्या या नेत्यांना अडचणीत असलेल्या जनतेचा विसर पडणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे.राजकारणात या विभागातील जनतेच्या जीवावर मोठे झालेल्या नेत्यांनी सोयीस्कर पणे जनतेला वाऱ्यावर सोडून दिलेले दिसत आहे.फुटक्या रुपड्याची मदत आढळा विभागातील कोरोना रुग्णांसाठी या नेत्यांकडून झाली नाही.भविष्य काळात आढळाविभागातील जनता आपणास माफ करणार नाही.विद्यमान आमदारांनी या विभागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे.जनता मृत्यूच्या दाढेत असताना लोकप्रतिनिधी मात्र राजकारणाच्या खेळया खेळण्यात मश्गुल आहेत.आरोग्य केंद्रामध्ये कोणत्याही सुविधा नाहीत,कोरोनाच्या टेस्ट होत नाही,लसी करणासाठी नागरिकांना तासंतास ताटकळत बसावे लागत आहे.या भागातील खाजगी डॉक्टर जनतेची मोठ्या प्रमाणात जनतेची अर्थिक लूट करत आहे,प्रशासनाकडून कोरोना सेंटर साठी कोणतीही मदत होत नाही.कोरोना सेंटर सुरू झाल्यापासून एकदाही सरकारी यंत्रणा या ठिकाणी पोहचली नाही.आढळा परिसरातील जनता अडचणीत असताना तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना व प्रशासनाला याचे गांभीर्य वाट नाही या गोष्टीचा आढळा विभागाच्या वतीने निषेध करण्यात आला.कोरोनाच्या कालावधीत शासनाच्या वतीने जनतेसाठी सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात अन्यथा आढळा विभागाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके,कैलासराव जाधव,राहुल बेनके,सोमनाथ मेंगाळ,बादशहा एखंडे,चक्रधर सदगीर,विलास भरीतकर,भरत मेंगाळ,के.बी.दराडे,नामदेव मधे, पुनाजी मेंगाळ,मधुकरराव दराडे,अमोल सहाणे,निलेश सहाणे,सोमनाथ पवार,सोमनाथ सहाणे,विजय मेंगाळ,कासम मणियार,आयुब शेख,दत्तू ढोन्नर,संकेत एखंडे,निलेश सहाणे,संजय सहाणे, दत्तू चौधरी,संजय गोरे,जहीर शेख,मंगेश चौधरी,राजू भरीतकर,किरण शेळके आदींसह आढळा विभागातील नागरिकांनी दिला आहे.
राजकीय पोळी भाजणा-या नेत्यांचा निषेध । विद्यमान आमदारांसह ,तालुक्यातील नेत्यांनी आढळा परिसरात कोरोनाच्या काळात दुर्लक्ष केले,जनतेचा फक्त राजकारणापूरताच वापर करून आपली राजकीय पोळी भाजणा-या नेत्यांचा आढळा परिसराच्या वतीने जाहीर निषेध करतो.
बादशहा एखंडे, चेअरमन टाहाकारी सोसायटी
कोव्हिडं सेंटर सुरू केल्याने आधार समशेरपूर या ठिकाणी मा.आमदार वैभवराव पिचड व रावसाहेब वाकचौरे यांनी कोविड सेंटर सुरू केल्याने आढळा परिसरातील जनतेला आधार मिळाला आहे.
कैलासराव जाधव, सामाजिक कार्येकर्ते
कोरोनाचे रुग्ण वाढण्यास प्रशासन जबाबदार आरोग्य विभागाचा भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असून आढळा विभागात कोरोनाचे रुग्ण वाढण्यास प्रशासन जबाबदार आहे.संबंधितांवर शासनाने कडक कारवाई करावी .
सोमनाथ मेंगाळ चेअरमन - सोसायटी , समशेरपूर



कोणत्याही टिप्पण्या नाहीत