कोपरगाव/प्रतिनिधी शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी पाच नंबर साठवण तलाव व्हावा; यासाठी माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता दिल्लीपर्यंत पाठपुर...
कोपरगाव/प्रतिनिधी
शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी पाच नंबर साठवण तलाव व्हावा; यासाठी माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता दिल्लीपर्यंत पाठपुरावा करू शकतो. परंतु, राज्यात व देशात भाजपची सत्ता असतानाही तत्कालीन आमदारांना हे काम जमले नाही. त्यांनी फक्त अडथळे आणण्याचेच काम केले असल्याचा आरोप नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वहाडणे म्हणाले आहे की, पाच नंबर साठवण तलावासाठी मी स्वतः नोव्हेंबर २०१८ मध्ये दिल्ली येथे जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तत्कालीन भाजप उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्यासमवेत भेट घेतली. त्यानंतर हा तलाव मुंबई-नागपूर (समृद्धी) महामार्गाचे काम करणाऱ्या 'गायत्री' कंपनीच्या माध्यमातून होण्याबाबत अवगत केले. त्याची त्वरीत दखल घेऊन गायत्रीच्या रेड्डी यांना संपर्क करून खोदकाम करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार त्यांनी खोदकामही सुरू केले.
त्यापूर्वी संजय काळे, नितीन शिंदे यांच्यासह शिर्डी येथे रेड्डी यांची भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली होती. त्यांनतर पाच नंबर तलावाचे काम सुस्तावले. म्हणून या कामात कोण आडवे पडले, गायत्री कंपनीवर कुणी दबाव आणला हे जनतेला माहीत आहे, असा खुलासाही केला.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत आशुतोष काळे निवडून आले. त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा करून हे काम पुन्हा सुरू केले. आता पाच नंबर साठवण तलाव ( सिमेंट काँक्रीट) व संबंधित कामाचे इस्टीमेट तयार करून तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत