राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील टाकळीमिया पाठोपाठ राहुरी फॅक्टरी येथील हॉटेल व्यवसायिकाच्या कामगाराला खासगी सावकारीवाल्यांकडून मध्यरा...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया पाठोपाठ राहुरी फॅक्टरी येथील हॉटेल व्यवसायिकाच्या कामगाराला खासगी सावकारीवाल्यांकडून मध्यरात्रीच्या सुमारास मारहाण करून व्याजाच्या पैशाची मागणी केल्याने तर खासगी सावकारांचे पिल्लावळ, अवैध व्यवसायिक करणारे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण यांच्याकडून 'त्या' हॉटेल व्यावसायिकाला होणारी सततची दमबाजी व फुकट खाण्याच्या त्रासाला कंटाळून गेल्या दोन दिवसापासून हॉटेल व्यवसायीक व कामगारांनी पलायन केले आहे. याबाबत वृत्तपत्र व सोशल मीडिया प्रसिद्धी माध्यमाने आवाज उठविला असूनही पोलीस प्रशासन मात्र गप्पच असल्याचे दिसत आहे.
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील कन्स्ट्रक्शन व्यवसायातील ठेकेदाराने ५ खासगी सावकारांकडून व्यवसायासाठी व्याजाने पैसे घेतले होते. दरमहा व्याजाची रक्कम न चुकता पोहच केली जात होती. परंतु कोरोनामुळे कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय मंदावल्यामुळे आर्थिक चनचन भासू लागली. त्यामुळे खासगी सावकारांचे व्याज वेळेवर न देता आल्याने खासगी सावकाराकडून शारीरिक जाच व मानसिक छळ सुरू झाल्याने 'त्या' ठेकेदाराने आत्महत्येचे पाऊल उचलले.सदर ठेकेदाराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.परंतू सुदैवाने कुटुंबाच्या लक्षात आल्याने 'त्या' ठेकेदारास वाचविण्यात आले आहे. त्याच्यावर नगर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सूरु आहेत.
राहुरी फॅक्टरी येथील ताहाराबाद चौकातील हॉटेल व्यवसायिक कोरोनाच्या काळात व्यवसाय मंदावल्याने देवळाली प्रवरातील २ तर राहुरी फॅक्टरी येथील ५ खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. सर्व पैसा व्यवसायात लावला दरमहा नित्यनेमाने व्याजाची अव्वाची सव्वा रक्कम खासगी सावकारांना दिली आहे. खासगी सावकाराने व्याजाच्या अमिषापोटी हॉटेल चालकाला त्रास देण्याच्या हेतूने गेल्या तीन दिवसा पूर्वी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास देवळाली प्रवरा येथील खासगी सावकारासह त्यांच्या पंटरने कामगार झोपेत असताना हॉटेलमध्ये घुसून मारहाण करून हॉटेलच्या काऊंटरची मोडतोड केली. व व्याजाच्या पैशाची मागणी करुन दमबाजी करण्यात आली. तर या मारहाणीच्या दोन दिवस आगोदर 'त्या' हॉटेल व्यवसायिकाच्या दुसऱ्या शाखेतील कामगारांना अवैध व्यवसाय चालकाकडून व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांनी हॉटेलवर जाऊन मारहाण केली व तू आम्हाला फुकट का खाऊ घालत नाही. असे म्हणून दमबाजी करुन मारहाण करण्यात आल्याची माहिती समजते.
या दोन्ही घटनेनंतर हॉटेल व्यावसायिकाने दोन्ही शाखेच्या कामगारासह पलायन केले. 'त्या' हॉटेल चालकाने मारहाणीची धास्ती घेतली असून खासगी सावकार उद्या पैशासाठी कोणत्या स्तराला जाऊ शकतात या भीतीने राहुरी फॅक्टरी येथील चालू व्यवसाय बंद करून निघून जाण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी या हॉटेल चालकशी संपर्क साधून तू व्यवसाय पुन्हा सुरू करावा, तुझ्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ असे सांगितले आहे. परंतु हॉटेल व्यवसायीकाची मनस्थिती चांगली नसल्याने पुन्हा राहुरी फॅक्टरी येथे व्यवसाय नकोच असे त्याने प्रतिष्ठित नागरिकांशी बोलताना सांगितले.
राहुरीच्या पोलीस निरीक्षकांचा गुन्हेगारीवरील अंकुश कमी
राहुरी तालुक्यात नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी पदभार घेतल्यापासून गुन्हेगारी वाढली असून त्यांना राहुरीच्या गुन्हेगारीवर अंकुश मिळविता आला नाही. गेल्या १ ते २ आठवड्यापासून खासगी सावकाराच्या जाचास कंटाळून अनेक घटना घडत आहेत. राहुरीचे पोलीस निरीक्षक इंगळे यांनी याबाबत माञ कानावर हात ठेवले आहेत.
खासगी सावकारांचा बंदोबस्त करावा अन्यथा..
राहुरी तालुक्यात सध्या खासगी सावकारांचा सुळसुळाट असून त्यात देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथे खासगी सावकारांची सर्वाधिक संख्या आहे. खासगी सावकार व्याजाच्या पैशासाठी अनेकांना त्रास देत असल्याच्या घटना पुढे येत आहे. तर व्याजाच्या वसुलीसाठी खासगी सावकार दारात आल्यानंतर अनैतिक भाषेचा वापर करतात. त्यामुळे सर्वसामान्य माणूस खासगी सावकारांच्या तोंडाला लागत नाही आणि त्या भीतीपोटी वेगळा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जातो. यात अनेकांनी जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे खासगी सावकारांचा बंदोबस्त पोलीस व दुययम निबंधक यांनी तातडीने करावा अन्यथा नाशिकचे पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांच्या निवेदनाद्वारे कारवाई करण्याची मागणी करणार आहे.
सुनील कराळे, शिवसेना शहरप्रमुख
कर्जतच्या पोलिसांचे अनुसरण राहुरीच्या पोलिसांनी करण्याची गरज
कर्जत येथील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी खासगी सावकाराच्या ताब्यात असलेली जमीन 'त्या' सर्वसामान्य नागरिकास मिळवून दिल्याने यादव यांना कर्जतकरांनी डोक्यावर घेतले. यादव यांनी कर्जतमधील खासगी सावकारांना धडा शिकवण्यासाठी मोठे पाऊल उचचले आहे. त्यातूनच खासगी सावकाराने जमीन परत करण्याची घटना घडली आहे. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षकांसह पोलीस बांधवानी कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे अनुकरण राहुरी तालुक्यातील खासगी सावकारकीचा बिमोड केला तर सर्वसामान्य जनता राहुरीच्या पोलिसांना डोक्यावर घेऊन नाचेल. मात्र राहुरीचे पोलिस खरच कर्जतच्या पोलीस निरीक्षक यादव यांचे अनुकरण करतील का असा प्रश्न येथील जनता उपस्थित करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत