कोपरगाव(प्रतिनिधी):- पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काळे पार्टीने २८ विकास कामाला न्यायालयातून खोडा आणल्याच्या आडून शहरातील रस्त्यांच्य...
कोपरगाव(प्रतिनिधी):-
पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काळे पार्टीने २८ विकास कामाला न्यायालयातून खोडा आणल्याच्या आडून शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेचे खापर भाजप-शिवसेना नगरसेवकांवर फोडून राजकीय लाभ उठवण्यासाठी जनतेचा कळवळा असल्याचा देखावा करीत अति उत्साहात रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मुरूम टाकून श्रमदान केल्याचा कांगावा केला,.रस्त्यावर मुरूम टाकला पण पावसामुळे दोन दिवसात रस्त्याचे तीन-तेरा वाजले, पालिकेच्या रस्त्यावर परस्पर मुरूम टाकण्याची परवानगी यांना कोणी दिली,याचा जाब पालिका प्रशासन विचारणार आहे की नाही ? असा सवालही भाजपा शहराध्यक्ष दत्तात्रय काले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केला आहे.
ते पुढे म्हणाले की, दोन दिवसापूर्वी काळे गटाच्या नगरसेवकांनी लोकप्रतिनिधी आमदार आशूतोष काळे यांचे फोटो असलेले टी-शर्ट घालून मोठा गाजावाजा करत शहरातील गांधीनगर भागातील रस्त्यावरील खड्डे मुरूम टाकून बुजविले होते.मात्र दोन दिवसांपासून सतत अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी रस्त्यात मोठ्या प्रमाणात चिखल व पाणी साचल्याने रहिवाशांना ये-जा करणे जिकिरीचे झाले आहे.
रस्त्यावर पाणी साचून, चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे, .त्याकडे कुणाचेही लक्ष नाही.या परिसरातील नागरिक नरकयातना भोगत असल्याची भावना व्यक्त करीत आहेत.याबाबत पालिका प्रशासनाचे संबंधित अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही त्याकडे ते कानाडोळा करीत असल्याची खंत येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.
नगरपालिकेची परवानगी न घेता खड्डे बुजविण्यासाठी मुरूम टाकला नसता तर एवढ्या मोठ्या प्रमाणात चिखल पसरला नसता व रस्त्यात पावसाच्या पाण्याचे डोह साचले नसते, या साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे, ज्येष्ठ नागरिक,महिला,विद्यार्थी व रहिवासीयांना चिखलातून रस्ता काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
पावसाळा सुरू असल्याने डेंगू,मलेरिया,साधा ताप यांसारख्या आजाराने नागरिक हैराण होतात,मग याचे काय असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.चिखलापेक्षा खड्डे बरे होते अर्थात भीक नको पण कुत्रा आवर अशी म्हणण्याची पाळी येथील नागरिकांवर आली आहे असे काले यांनी शेवटी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत