कोपरगाव/प्रतिनिधी :- कोपरगाव नगरपरिषदेत सतत राजकीय संघर्ष सुरू राहण्यातच काहींचे हित असावे असे वाटते. वहाडणे व कोल्हे यांच्यात झालेल्या चर्च...
कोपरगाव/प्रतिनिधी :-
कोपरगाव नगरपरिषदेत सतत राजकीय संघर्ष सुरू राहण्यातच काहींचे हित असावे असे वाटते. वहाडणे व कोल्हे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर 28 विकासकामांना असलेली स्थगिती उठविली गेली. सदरची कामेही आता मार्गी लागतील याबद्दल समाधान व्यक्त करण्याऐवजी एका महान पत्रकाराने बरेच तारे तोडले आहेत. यावरुन राजकीय संघर्ष असेल तरच काहींची रोजीरोटी चालते हे अधोरेखित होत असल्याची कोपरखळी नरेंद्र मोदी विचार मंचचे वसंत जाधव यांनी एका पत्रकाराचे नाव न घेता मारली आहे.
याविषयी अधिक स्पष्टीकरण देताना वसंत जाधव म्हणाले, खरेतर पत्रकारांनी तटस्थ विचार ठेवून पत्रकारिता केली पाहिजे. नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी जास्तीत जास्त विकासकामे मार्गी लागावीत यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले होते. त्याला कोल्हे गटानेही सकारात्मक प्रतिसाद देऊन उच्च न्यायालयातून याचिका मागे घेतली. काळे गटही सकारात्मक आहे. नगराध्यक्ष वहाडणे यांनी सध्या तरी मला कुठलेही आरोप-प्रत्यारोप करायचे नाहीत, जनतेची विकासकामे व्हावीत हिच अपेक्षा असल्याचे सांगितले. राजकीय वादाशी जनतेला काहीही देणेघेणे नाही. म्हणून सर्वांना असे आवाहन केले असल्याचा पुनरुच्चारही केला.
मात्र, तरी देखील एखादा पत्रकार जाणीवपूर्वक टीका-टीप्पणी करून नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना डिवचणार असेल तर आम्ही कार्यकर्तेही त्या पत्रकाराचा सर्व इतिहास जनतेसमोर मांडायला तयार आहोत. वृत्तपत्रात बातमी देऊन वहाडणे विरुद्ध कोल्हे यांच्यात पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले तरच आपली रोजीरोटी चालेल असा स्वार्थी विचार करून कुणी पत्रकारिता करू नये. शहराच्या हिताचा विचार करावा. लेखणी व्यवस्थित वापरली असती तर तुमची खरी पत्रकारिता जनतेलाही पटली असती. लवकरच नगराध्यक्ष वहाडणे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांचा हिशोब आम्ही मांडणार आहोतच. त्यानंतर अशा पत्रकाराला तोंड लपवायला जागा राहणार नाही असा हल्लाबोल जाधव यांनी करुन गेल्या साडेचार वर्षात झालेली विकासकामे जनतेसमोर आहेत. मोक्याचे रस्ते आता होतील, पण सर्वच प्रभागात जाऊन पहा प्रचंड विकासकामे झालेली आहेत. प्रभागानुसार आकडेवारीनिशी कामांचा हिशोब जनतेसमोर येणारच आहे. त्यामुळे राजकीय लावालाव्या करू नका आणि नगराध्यक्ष वहाडणे यांनी सध्या बोलायचे नाही असे ठरविले आहे त्याचा गैरफायदा घेऊ नका, असे आवाहन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत