राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे जलस्वराज्य टप्पा २ योजनेंतर्गत सुमारे ९ कोटी २७ लाख रूपये खर्चून सुमारे एक वर्षापूर्वी कार...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे जलस्वराज्य टप्पा २ योजनेंतर्गत सुमारे ९ कोटी २७ लाख रूपये खर्चून सुमारे एक वर्षापूर्वी कार्यान्वित झालेली पिण्याच्या पाण्याची योजना संबंधीत ठेकेदाराचा आडमुठेपणा आणि श्रीरामपूर विभागाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बेपवाईमुळे कुचकामी ठरली आहे. या योजनेचे काम अत्यंत नित्कृष्ठ दर्जाचे झाले असून योजनेचे कामही अर्धवट झाले आहे. सदर कामाची चौकशी होऊन संबंधीत ठेकेदार व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण श्रीरामपूर विभागाचे अभियंता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रिपाई (आठवले गट) चे युवानेते बाळासाहेब जाधव यांनी जिल्हाधिकारी व प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. ही योजना पूर्णत्वास नेऊन ती समाधानकारकरित्या चालू करून द्यावी अन्यथा या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असून घरोघरी जाऊन ग्रामस्थांच्या सह्यांची मोहीम राबवून आंदोलन करण्याचा इशारा बाळासाहेब जाधव यांनी दिला आहे.
एक वर्षापूर्वी टाकळीमियाच्या गावच्या दृष्टीने महत्वाची असलेली ही योजना सुरू झाली मात्र अत्यंत दुषित पाणी, नित्कृष्ठ साहित्य आणि अपूरा पाणीपुरवठा यामुळे ग्रामस्थ विशेषतः महिला संतप्त झाल्या आहेत. राज्य शासनाने या योजनेबाबत घालून दिलेल्या नियमावलीची संबंधीत ठेकेदार आणि श्रीरामपूरच्या जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी पायमल्ली केल्याचे आढळून आले आहे. योजनेचे काम अत्यंत नित्कृष्ठ झाल्याने व दुषित पाणीपुरवठा होत असल्याने टाकळीमिया ग्रामपंचायतीने ही योजना ताब्यात घेण्यास लेखी पत्राद्वारे नकार दिला आहे. मात्र, त्यावर श्रीरामपूर विभागाकडून कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. या योजनेंतर्गत बसविण्यात आलेल्या मशिनरी, इलेक्ट्रीक मोटारी, पाईपलाईन अत्यंत दुय्यम दर्जाचे आहेत. जलशुद्धीकरण योजनेवर बसविण्यात आलेल्या विद्युत मोटारी अनेकदा बंद पडत असल्याने पाणी शुद्धीकरण होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य या दुषित पाण्यामुळे धोक्यात आले आहे.
वास्तविक टाकळीमिया ग्रामपंचायतीचा कारभार गावच्या दृष्टीने नेहमीच विकसाभिमुख आहे. गावात झालेली विकासकामे स्थानिक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या सहयोगदानामुळे अत्यंत चांगली झालेली आहे. त्यामुळे या योजनेच्या नित्कृष्ठ दर्जाने गावच्या लौकीकाला गालबोट लागले आहे. योजना नित्कृष्ठ असल्याची व अर्धवट राहिल्याची तक्रार संबंधीत अधिकारी व ठेकेदाराकडे करणयात आली. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. योजनेसाठी ग्रामपंचायतकडे एक रूपयाचाही निधी अद्याप देण्यात आलेला नाही. श्रीरामपूरचे विभागीय अधिकारी आणि संबंधीत ठेकेदारांमध्ये निधीबाबत आर्थिक देवघेव झाल्याचाही आरोप श्री. जाधव यांनी केला आहे. ठेकेदाराविषयी या योजनेबाबत अनेक तक्रारी आहेत. मात्र, श्रीरामपूर महा. जीवन प्राधिकरणाचे अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.
ही योजना सुरळीत होऊन ग्रामस्थांना शुद्ध व पुरेशा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा योजनेतून व्हावा एवढीच अपेक्षा ग्रामस्थांची आहे. मात्र ही अपेक्षा धुळीस मिळाली आहे. या योजनेच्या नित्कृष्ठ दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी, संबंधीत ठेकदार व श्रीरामपूरचे विभागीय अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी अन्यथा याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल व ग्रामस्थांच्या सह्यांची मोहीम राबवून व्यापक जनजागृती करणार असल्याचा इशारा बाळासाहेब जाधव यांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत