विश्वविख्यात तत्ववेत्ते परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले तथा दादाजींनी सांगितले आहे... "काही लोक चार दिवस लाभले आहेत, ते साधून येतात. ख...
विश्वविख्यात तत्ववेत्ते परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले तथा दादाजींनी सांगितले आहे... "काही लोक चार दिवस लाभले आहेत, ते साधून येतात. खाण्या पाण्यात व मजा करण्यात जीवनयात्रा पुरी होताच जग सोडून जातात. पण एखादा असा निपजतो, जो जीवन स्वच्छ व निर्मळ ठेवून विकासाचे उन्नत शिखर गाठण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो!" परमपूज्य दादाजींचा या सूक्ष्म निरीक्षणाचे दर्शन घडते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या जीवन प्रवासात...
आज ३० डिसेंबर. समाजक्षेत्रातील एक व्रतस्थ कर्मयोगी स्व.पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांचा स्मृतिदिन. पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर देशात व अंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक उच्चपदांवर आपल्या कार्यकर्तृत्वाची मोहर उमटवली आहे, तरीही त्यांच्या सहवास सानिध्यात आलेली आम्ही मंडळी त्यांना 'खासदार साहेब' चं म्हणत असू. त्यांच्या सहवासातील अनंत आठवणी आज दाटून येत आहेत. आज ते आपल्यात नाहीत म्हणून मन सैरभैर होत आहे.
आदरणीय स्व. पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटलांविषयी आज वेगळे काही लिहिण्याचा विषय नाही. त्यांनी स्वतःच स्वतःची आत्मगाथा 'देह वेचावा कारणी' लिहून अनेकांच्या अनेक प्रश्नांना, जीवनातील कडू-गोड़ स्मृतींना, वाद-प्रति वादांना, स्वतःच्या व्रतस्थ आचरणाच्या संघर्षाच्या भूमिकेला शब्दबद्ध केले आहे. ते जाणून घेण्याची संधी आता प्राप्त होत असल्याची एक वेगळीच आनंददायी हुरहूर मनात दाटली आहे. तसे म्हणाल तर स्व बाळासाहेब विखे पाटलांचा म्हणजे खासदार साहेबांचा आणि आमचा परिचय झाला १९८२-८३ मध्ये पाणी प्रश्न वरील आंदोलनात कडव्या संघर्षातून झाला होता, राज्यच नव्हे तर देश पातळीवर प्रचंड दबदबा असलेली व्यक्ती त्या वेळी स्वतःच पुढाकार घेऊन आमच्या सारख्या नवख्या चळवळी आंदोलनात उतरलेल्या नाव शिक्या पोरांशी सुसंवाद साधून मार्ग शोधण्यासाठी मदतीची भूमिका घेते ही आमच्यासाठी कुतुहुलाची बाब होती. "प्रसंगी मला घेराव घाला, गावबंदी करा त्याशिवाय आम्हा राजकारण्यांना जाग येणार नाही. तुमचा हेतू-उद्दिष्ट प्रामाणिक आहे, लढा, गनिमी काव्याने लढा! तुमचा पाणीप्रश्न सुटावा म्ह्णून संघर्ष चालू ठेवा फक्त अतिरेकी प्रकार करू नका. मी माझ्या परीने पाहिजे ती मदत करील!" असा सल्ला देत त्यांनी आम्हाला पाठींबा दिला. …आणि साहेबांनी आपला शब्द पाळला. भागडा चारीला प्रथम तत्त्वता आणि नंतर अंतिम मंजुरी मिळाली. पुढे अनेक राजकीय उलथा पालथी झाल्या. भागडा चारीचे मूळ स्वरूप बदलून तिची दिड फुटी पाईप चारी झाली. प्रत्यक्ष नव्हे तर ‘अप्रत्यक्ष सिंचनाचा पथदर्शी प्रकल्प’ म्हणून! असो, तो विषय वेगळा आहे. खासदार साहेब व आमचा संपर्क आला संघर्षातून, पण नाते जडले जन्म-जन्मांतरीचे!
पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील म्हणजे भारतीय कृषी व औद्योगिक क्रांतीचे अग्रदूत. त्यांच्याकडून… आपल्या पित्या कडून समाजसेवेचा समर्थ वारसा घेऊन त्यांचे रचनात्मक काम पुढे नेत असतानाच परिवर्तनवादी चळवळींना बळ देण्याचे काम खासदार साहेबांनी अखेर पर्यंत केले. लोकशाही, धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद, सामाजिक न्याय आणि समता म्हणजे समाजवाद हा त्यांनी हयातभर अंगी कारलेल्या तत्वज्ञानाचा गाभा असल्याचे दिसून येते.
देशाचे भावी नागरिक असलेल्या किशोरवयीन व महाविद्यालयीन युवकांपासून ते सेवानिवृत्तीचे जीवन जगण्याऱ्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत त्यांचा संपर्क होता. शेतात राबणारे शेतकरी शेतमजूर औद्योगिक क्षेत्रातले कामगार आणि सैन्य दलातील जवानांच्या जीवनाचा अभ्यास, त्यावर चिंतन-मनन हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होते. ‘सैन्य दलातील जवान, शेतकरी आणि श्रमजीवी माणसांच्या अंगातून गळणारे घामाचे पाणी हे सर्वात थोर तीर्थ आहे. ते म्हणजे जगाचे पोषण आहे. तुमचे शरद जोशी तरी वेगळे काय मागतात... 'भीक नको हवे घामाचे दाम!' म्हणूनच त्यांची व माझी रास जुळते,’ असेही ते आवर्जून सांगत.
खासदार साहेब तसे काँग्रेस विचारसरणीतील निष्ठावान पाईक. भले काँग्रेसने त्यांची म्हणावी तशी कदर केली नाही पण ह्या गोष्टीचा त्यांच्यावर विपरीत परिणाम झाला नाही. त्यांचे अन्य पक्षात म्हणजे समाजवादी, कम्युनिस्ट, संघ भाजपा, शिवसेना, शेतकरी संघटना, पाणी पंचायती, वारकरी संप्रदाय, अंधश्रद्धा निर्मूलन, इतर अनेकांशी मैत्रीचे संबंध होते. ते त्यांनी त्याच प्रेमाने विश्वासाने जतन केले होते.
खासदार साहेबांचे भाषण म्हणजे एकसूरी पाठांतर केलेले पढिव स्वरूपाचे नसायचे. श्रोत्यांशी मनापासून साधलेला, श्रोत्यांच्या मनापर्यंत भिडलेला सुसंवाद असायचा. दैनंदिन जीवनात सहज दिसणारी निरीक्षणे नमूद करून साहेब आपले विचार मांडत असत. 'आपल्याकडे श्रम व शिक्षण याची फारकत झाली आहे. शिक्षण म्हणजे शारीरिक कष्ट न करणे असेच या शिक्षित युवकांनी ठरविलेले दिसते पण ते योग्य नाही. परिश्रम किंवा कष्टाने जे यश मिळते तेच शाश्वत असते. सर्वात मोठे असते. सामाजिक चालीरीतीं बाबत ते सांगत, ‘ज्या चालीरीती सत्याकडे नेतील, प्रेमाकडे नेतील, सर्वांच्या विकासाकडे नेतील त्याच चालू ठेवाव्यात. सामाजिक भेदभाव जातीयवाद, हुंडा मानपानांवर होणारा खर्च आणि सर्व प्रकारच्या व्यसनांना कायमची मूठ माती देण्यासाठी सर्वानी पुढे आले पाहिजे.’
शिक्षण क्षेत्रातील खासदार साहेबांचे योगदान सूर्यसारखे दैदिप्यमान होऊन सर्वाना प्रकाश देत आहे. त्यामागे त्यांचे अपारकष्ट, अफाट जिद्द आणि ढोर मेहनत आहे. या बाबतची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले होते, 'शिक्षण हे जीवनाला आकार व आधार देण्याचे साधन आहे. शिक्षणाने मनाचा व मनाने जीवनाचा विकास साधावा. सध्या स्पर्धेचे युग आहे प्रत्येक गोष्टीत स्पर्धा करूनच पुढे जावे लागेल त्यासाठी गुणवत्तेची जोपासना करावी लागेल. सरकारी क्षेत्राचा अपवाद सोडला तर योग्य गुणवत्ता असेल तर प्राधान्य मिळतेच. आता समान नागरी कायद्याची गरज आहे अन्यथा आरक्षणाच्या प्रश्नावरून आगडोंब उसळेल. आरक्षण द्यायचे तर आर्थिक निकषांवर द्या असे मत ते मांडत असत.
खासदार साहेब आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात अध्यात्मात रस घेऊ लागले होते. संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेवर त्यांचे मन जडले होते. त्याच प्रेमातून म्हणा किंवा पिढीजात वारकरी घरात जन्म झाला म्हणून म्हणा त्यांनी पुढाकार घेत संत तुकाराम महाराजांचे टपाल तिकीट प्रकाशित करत वारकरी संप्रदायाचा भगवा अग्रभागी झळकाविण्यात यश मिळविले.
श्री क्षेत्र आळंदी येथे मान्यवर मंडळींशी चर्चेच्या वेळी 'द्वैत अद्वैताच्या अध्यात्मिक वादात मी जात नाही, त्या वादाला माझा विरोध नाही आणि पाठींबाही नाही! आम्ही कर्मवादावर, कष्ट परिश्रमावर विश्वास श्रद्धा प्रेम ठेऊन आहोत, जे जसे आहे तसे स्वीकारा! असे सांगतो, सनातन वाद्यांच्या वाह्यात पोरकट कल्पनांना शाब्दिक उत्तर देण्यापेक्षा कृतिशील उत्तर देण्यात धन्यता मानतो. प. पु. पांडुरंग शास्त्री आठवले दादा यांच्या स्वाध्याय परिवाराची सगळयांना गरज आहे. समानता व प्रेमाचे ऐक्य निर्माण करणे यात माणुसकी आहे. मनुष्याचा खरा आनंद दुसऱ्याच्या सुख दुःखात एकरूप होण्यात आहे. धर्म म्हणजे समोरच्याला समजून घेणे, ओळखायले शिकणे व त्यांच्याशी एकरूप होणे, दुसरे काय? दुसऱ्यावर हसणे सोपे असते पण दुसऱ्यांसाठी रडणे फार कठीण असते, त्यासाठी अंतःकरण निर्मळ असावे लागते.'
गावठाणातील येसकरापासून ते देशाच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या पंतप्रधान, राष्ट्रपतींशी व्यक्तिगत जिव्हाळ्याचे नाते निर्माण करून ते जोपासण्याची जन्मजात हातोटी त्यांना लाभली होती. थोरांप्रती सदैव भक्तीभाव बाळगून सर्वांची सुख-दुःखे समजावून घेऊन त्यांनी सर्वांवर अकृत्रिम प्रेम, आदर, भक्ती भावाची पखरण केली. त्यांनी अवघे आयुष्य समाज चरणी समर्पित करून देह वेचावा कारणी या त्यांच्या जीवन धारणेचे अलौकिक दर्शन घडविले. या आत्मगाथेचे नाव 'देह वेचला सत्कारणी!' असे पाहिजे होते… पण खुद्द खासदार साहेबांनीच स्वतःच नामभीदान केले आहे. आपल्या आयुष्यातील क्षणांची साथ संगत मांडताना त्यांची पायाभूत भूमिका होती... ‘देह वेचावा कारणी!’ त्यासाठीच ते जगले आणि आजही विविध क्षेत्रात केलेल्या सत्कार्यामुळे सदोदित जगते राहणार आहेत - आणि समाज स्वास्थ्यासाठी धडपडणाऱ्या सर्वाना संदेश देणार... 'देह वेचावा कारणी!'
पण...पण, "ती सत्वशील पाऊले विसावली वैकुंठात
कोठे माथा ठेऊ आता देव नाही देव्हाऱ्यात |"
लेखक
सुधाकर कराळे, देवळाली प्रवरा
९४२०९५१८८७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत