देवळाली प्रवरा(वेबटीम):- देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आण्णासाहेब मासाळ व परिचारिका यांची त्रिसदस्यीय...
देवळाली प्रवरा(वेबटीम):-
देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आण्णासाहेब मासाळ व परिचारिका यांची त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी होणार असल्याने बाळंतपणासाठी आलेल्या महिलेवर दबाव टाकून आम्ही सांगतो तसा जबाब देण्यात यावा असा दबाव प्राथमिक आरोग्य केंद्रतील व कर्मचारी यांनी आणला असल्याचे पिडीत महिलेच्या नातेवाईकांनी सोशल मिडियावर तिचा एक व्हिडीओ प्रसारित करून सांगितले आहे.
याबाबत देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्रात राहुरी फॅक्टरी येथील कोमल अरुण शिंदे ही महिला बाळंतपणासाठी आली असता तिला हाकलून देण्यात आले.त्यानंतर सदर महिलेचे बाळंतपण प्राथमिक आरोग्य केंद्रापासून हाकेच्या अंतरावर रस्त्यावर झाले. सदर घटनेबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र असंतोष व्यक्त केला होता. या घटनेची माहिती आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांना निलंबित करण्याची मागणी केली होती.
वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यानी या घटनेची गांभीर्याने दखल घेतल्याने श्रीरामपुरचे आ.लहू कानडे व राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांनी दखल घेऊन कोरोनामुळे मुंबईत उपचार घेत असल्याने पिताश्री माजी खासदार प्रसाद तनपुरे यांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व पीडित महिलेच्या भेटीसाठी पाठविण्यात आले होते. पीडित महिलेला आ.कानडे व तनपुरे भेटण्यापूर्वी बाळंतपण कक्षात काही परिचारिका व कर्मचारी यांनी जावून सदर पीडित महिलेस आम्ही सांगितलेला दबाब दे नाहीतर तुझ्यासह बाळावर चुकीचे औषधोपचार होतील अशी दमबाजी केल्याचे नातेवाईकांनी आ.कानडे व माजी.खा.तनपुरे यांच्या लक्षात आणून दिले होते.त्यामुळे सदर महिलेने राजकीय नेत्यासह चौकशी समिती समोर आपला जबाब फिरवला आहे.
अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मासाळ यांच्याबद्दल नागरिकांतून तक्रारीचा पाऊस पडत आहे.त्यामुळे माजी खा.तनपुरे यांनी डॉ.मासाळ यांना आता तरी तुम्ही रामराम घ्या, अशी मिश्किल टिपणी केली आहे.
डॉ.मासाळ यांच्यामागे तालुक्यातुन राजकीय वरदहस्त कोणाचा आहे. याचा शोधही आ.कानडे व माजी.खा.तनपुरे यांनी घेण्यास सांगितले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र गोरगरिबांसाठी असले तरी त्याचा लाभ मात्र धनदांडग्याना होत आहे.गरीब रुग्णांना लाथ अन् धनदांडग्या रुग्णांना साथ मिळत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी मासाळ व कर्मचाऱ्यांबद्दल तीव्र असंतोष निर्माण होत आहे.
चौकशी समिती पीडित महिलेला खरोखर न्याय देईल का? पीडित महिलेने दबावापोटी जबाब फिरवला आहे.परंतु वृत्तपत्र व वृत्तवाहिन्या आणि सोशल मिडियावर रस्त्यावर बाळंत झालेल्या महिलेचे चित्रीकरण व फोटो प्रसारित झाले आहेत. मात्र चौकशी समिती केवळ जाब-जबावावर निर्णय घेणार असेल तर पीडित महिलेला न्याय मिळूच शकत नाही.चौकशी समितीत पीडित महिला व तिच्या पतीवर आरोप करणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिपाली गायकवाड यांचा समावेश असल्याने पीडित महिलेला न्याय मिळण्याऐवजी तिच्यावर आणखी अन्याय होणार आहे.तर चौकशी समितीचा अहवाल वादग्रस्त ठरणार असल्याचे संकेत डॉ.दिपाली गायकवाड यांच्या निमित्ताने आजच मिळत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत