कोपरगाव / प्रतिनिधी:- कोपरगाव शहरात मकर संक्रांतीनिमित्त बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या मांजावर पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उगारला आह...
कोपरगाव / प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरात मकर संक्रांतीनिमित्त बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या मांजावर पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरुवारी (ता.१३) एका विक्रेत्यावर छापा टाकून दोन हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मकर संक्रांतीनिमित्त सर्वत्र पतंग उडविण्यासाठी बालगोपाळांची लगबग असते. यासाठी बाजारपेठेत पतंग, आसरी आणि मांजा विक्रीसाठी उपलब्ध असतो. मात्र, पर्यावरणासाठी हानिकारक असणाऱ्या नायलॉन मांजाची सर्रासपणे विक्री होत असते. यावर बंदी असतानाही विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येते. शहरातील सरकारवाडा परिसरात विक्री करणाऱ्या तुळशीदास शिवलिंग पवार (वय ६२) याच्यावर छापा टाकून प्रत्येकी पाचशे रुपयांचे पाच रीळ असा एकूण दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस शिपाई लाला मासाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी तुळशीदास पवार यांच्या विरोधात गुरनं.५/२०२२ भादंवि कलम १८८, ३३६ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शहरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत