कोपरगाव / प्रतिनिधी:- शहरात सर्वाधिक मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे व छोटे दुकानदार कुटुंबांची संख्या मोठी आहे. त्यात गेल्या दोन वर्षांपासू...
कोपरगाव / प्रतिनिधी:-
शहरात सर्वाधिक मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे व छोटे दुकानदार कुटुंबांची संख्या मोठी आहे. त्यात गेल्या दोन वर्षांपासून कोविड संकटाने अधिक हाल झाले आहेत. याशिवाय आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होत असतानाही कोपरगाव पालिका वर्षाची पाणीपट्टी आकारत आहे. जे भरत नाही त्यांची नळ जोडणी तोडली जाते, हा पालिकेचा गोरगरीब नागरिकांवर अन्याय करणारा निर्णय असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पाटील यांनी म्हंटले आहे की, सध्या कोपरगाव नगरपालिका आठवड्यातून म्हणजे ८ (आठ) दिवसातून एकदा पिण्याचे पाणी देत आहे. परिणामी पाण्यासाठी नागरिकांना पाण्याचे कॅन विकत घ्यावे लागतात. महिन्यातून फक्त ४ दिवस पाणी देतात म्हणजे वर्षाला फक्त ४८ दिवस पाणी मिळते. मात्र, ३६५ दिवसांची पट्टी घेतात, म्हणजे रोज पाणी देण्याची पट्टी /कर घेतात आणि फक्त ४८ ते ५० दिवस पाणी देतात हे योग्य नाही.
गेली अनेक वर्ष नियमाने पाणीपट्टी घेऊन कमी पाणी देतात असे चालू आहे. तरी नागरिक नियमाने पट्टी भरत आहे. खरेतर आजही पाणी अस्वच्छ व अवेळी येते. कधी पाणी येण्याच्या वेळी वीज जाते म्हणून पाण्याच्या दिवशी महिलांना कामाचे खाडे करावे लागते. मागील दोन वर्षांच्या कोरोना काळात गोरगरीब हातावरच्या लोकांना, महिला भगिनींना काम नव्हते; त्यामुळे त्यांचे खूप हाल झाले. त्यामुळे सध्या होत असलेली पाणीपट्टी आकारणी अत्यंत अन्यायकारक असल्याची टीका माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केली आहे.
तसेच छोटी दुकाने काढून आजपर्यंत दहा वर्षे झाली तरी पुर्नवसन केले नाही. शहरातील गांधीनगर, लक्ष्मीनगर, जबरेश्वर मंदिर परिसर, सुभाष नगर, संजय नगर, खडकी, नदीकाठ परिसर, टिळक नगर, इंडोर हॉल या परिसरातील सुमारे ४० टक्के लोक मोलमजुरी करतात. अशा परिस्थितीत त्यांना पालिकेने सहकार्य करणे अपेक्षित असतानाही त्यांच्यावर कारवाई होते. परंतु, बड्या संस्था, शासकीय कार्यालये यांच्यावर का कारवाई केली जात नाही, असा सवालही पाटील यांनी केला आहे.
४२ कोटींची शहराची पाणी योजना ही ४९ कोटी पर्यंत गेली आहे. ती पूर्ण करून घ्यायची जबाबदारी नगरपालिकेची होती. तरी देखील का पूर्ण केली नाही. याशिवाय काम पूर्ण न करता, चाचणी न घेता ठेकेदाराला बिल अदा केले. याला जबाबदार कोण?
- मंगेश पाटील (माजी नगराध्यक्ष-कोपरगाव)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत