कोपरगाव / प्रतिनिधी:- कोपरगाव नगरपालिकेने शहरातील अतिक्रमण काढून दहा वर्षे होत आली आहे. येत्या १० मार्चला संपूर्ण दहा वर्षे पूर्ण होतील. तरी...
कोपरगाव / प्रतिनिधी:-
कोपरगाव नगरपालिकेने शहरातील अतिक्रमण काढून दहा वर्षे होत आली आहे. येत्या १० मार्चला संपूर्ण दहा वर्षे पूर्ण होतील. तरी देखील नगरपालिकेने अद्याप विस्थापितांचे पुनर्वसन केले नाही. त्यामुळे आता कधी करणार असा सवाल माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केला आहे.
याबाबत प्रसिद्धी पत्रकातून पाटील यांनी नगरपालिकेला अनेक प्रश्न विचारले आहेत. पालिकेने विकासाच्या नावावर अतिक्रमण काढले तो विकास झालाच नाही. ना रस्ते मोठे झाले, ना गोरगरीब विस्थापितांना गाळे, खोका शॉप, बेघरांना जागा मिळाली. खरचं विकासासाठी अतिक्रमण काढले तर मग आज अखेर सर्व रस्ते मोठे करून रुंदीकरण होऊन, रस्त्याच्याकडेला पेविंग ब्लॉक कुठे बसविले.
धारणगाव रोड, येवला रोड, बाजारतळ, बस स्टँड समोरील जागा, बैलगाडी तळ, मार्केट कमिटी समोरील रोड, इंदिरापथ, बैल बाजार रोड, बस स्टँड / खंदक नाला रोड, मच्छी मार्केट, तहसील कार्यालय लगत / पोस्ट ऑफिस मागील भागात, नदीकाठी रोड, चौक ते महावितरण कार्यालय ते कोर्ट आदी भागांतील छोटे दुकाने पाडून याठिकाणचे रस्ते आहे तसेच आहे. जागाही तशाच पडल्या आहेत. कधी होणार मोठे रस्ते / त्यालागत पादचारी मार्ग, छोटे खोका शॉप, पक्के गाळे, कधी बांधणार असा सवालही केला आहे. आजपर्यंत विस्थापित आशेवर राहिले. मोठे रस्ते होऊन गाव वाढेल धूळमुक्त होईल या आशेवर होते. मात्र यातील काहीही घडले नाही.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी श्रमिकराज कामगार संघटनेबरोबर अजय विघे, गणेश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या बरोबर नगरपालिकेला निवेदनही दिले होते. तरी अजूनही नगरपालिकेने खरे विस्थापितांची शहानिशा करून टप्याटप्याने का होईना जिथे शक्य होईल तिथे खोका शॉप, गाळे बांधून, ज्यांची घरे गेली त्यांना राहायला जागा देऊन न्याय द्यावा अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत