राहुरी फॅक्टरी(श्रीकांत जाधव) देवळाली नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या होममिनिस्टर तथा धर्मपत्नी प्रीती ताई कदम आगामी...
राहुरी फॅक्टरी(श्रीकांत जाधव)
देवळाली नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या होममिनिस्टर तथा धर्मपत्नी प्रीती ताई कदम आगामी नगरपालिका निवडणुकीत राहुरी फॅक्टरी येथील एका सुरक्षित वार्डातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. महिला दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमाचे सौ.कदम यांनी महिलांना आपलंसं करून परफेक्ट नियोजन केल्याने सौ. कदम नक्कीच फॅक्टरीतुन उमेदवारी करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
कालच्या ८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त सत्यजित कदम फाउंडेशन व इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते यांनी राहुरी फॅक्टरी येथे येऊन मोठे शक्तिप्रदर्शन केले. १०० ते १५० दुचाकी, चार चाकी वाहने व ट्रॅक्टर मधून देखील फेटे बांधलेल्या महिला रॅलीत सहभागी झाल्या होत्या. औचित्य महिला दिनाचे कि स्वप्न महिला नगराध्यक्ष होण्याचे हे या रॅलीतून लपून राहिले नाही. महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनार्थ प्रीती कदम यांनी राहुरी फॅक्टरी परिसरातील आदिनाथ, गुरुकुल, वृंदावन,समर्थनगर, कराळेवाडी, वैष्णवी चौक आदी भागात महिलांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी संवाद साधून महिला दिनाच्या कार्यक्रमास आमंत्रित केले. त्यानुसार महिलांनी कार्यक्रमास हजेरी लावून प्रीती कदम यांच्या नियोजनाचे कौतुक केले. स्टेजवर आपली भूमिका मांडताना सौ.कदम यांनी अगदी मनमोकळं पणाने कार्यक्रम कसा वाटला, पुढच्या वर्षी यापेक्षा मोठा कार्यक्रम करू , आपण सर्व मैत्रिणी म्हणून एकत्रित राहून असंख्य कार्यक्रम राबवू असा मनमोकळा संवाद महिलांशी साधला. दरम्यान आगामी पालिका निवडणुकीत सौ.कदम या राहुरी फॅक्टरी परिसरातून निवडणूक लढविणार असून सुरक्षित वार्ड ही त्यांनी शोधला असल्याची चर्चा यावेळी सुरू होती.
देवळालीत प्रवरात नव्याने प्रभाग रचना करण्याचे काम सुरू झाले असून ही प्रभाग रचना सत्ताधाऱ्यांना अनुकूल असल्याचे देखील चर्चा आहे.यामुळे रचना करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील आरोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विरोधक असंघटित असल्याचा भास सत्ताधाऱ्यांना होतो आहे की अजून सत्तेची काळी पट्टी त्यांच्या डोळ्या वरून निघाली नाही हे काळच ठरवणार आहे.
*राम-लक्ष्मणाची जोडी फुटली!*
सत्ताधारी भाजपच्या ५ वर्षाच्या कार्यकाळात किंबहुना मुदत संपेपर्यंत विविध कार्यक्रमाचे नियोजन राम-लक्ष्मणाची जोडी अर्थात सचिन ढुस व प्रकाश संसारे करत असत. इव्हेंट मॅनेजमेंटर म्हणून या जोडीकडे पाहिले जात होते. मात्र शिवजयंती पासून सचिन ढुस हे जरा अलिप्त झाले असून कालच्या महिला दिनाच्या कार्यक्रमास ढुस यांनी पाठ फिरवली. या कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी एकट्याने सुत्रसंचालन व इतर नियोजनाची धुरा सांभाळली. ढुस यांच्या अनुपस्थितीमुळे ते राष्ट्रवादीत दाखल होण्याच्या चर्चेलाही यावेळी उधाण आले होते.
*५०० फेट्यास २५ 'पैठण्यांच' जोरदार उत्तर*
महिलादिनी मोटार सायकल रॅलीत सहभागी झालेल्या महिलांना सत्यजित कदम फाउंडेशनच्यावतीने जवळपास ५०० फेटे बांधण्यात आले. हा कार्यक्रम सुरू असतानाच सत्ताधारी भाजपवर नाराज असलेले नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी देवळाली प्रवरा नगरपालिकेत जाऊन स्वच्छतेचे काम करणाऱ्या २५ महिला कामगारांना पैठणी साड्या वाटप उपक्रम राबविला. ५०० फेट्यास २५ पैठण्या भारी भरल्याची चर्चा शहरात सुरू होती. एकंदरीत देवळाली प्रवरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलीच चढाओढ शहरवासीयांना पहावयास मिळाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत