कोपरगाव प्रतिनिधी- २०१० पासून विस्थापित झालेल्या व्यावसायिकांचे प्रश्न आजपर्यंत मार्गी लागले नाहीत. त्यांच्या जीवावर २०१४ ची विधानसभा निवडणू...
कोपरगाव प्रतिनिधी-
२०१० पासून विस्थापित झालेल्या व्यावसायिकांचे प्रश्न आजपर्यंत मार्गी लागले नाहीत. त्यांच्या जीवावर २०१४ ची विधानसभा निवडणूक जिंकली. मात्र मागील पाच वर्षात सर्व प्रकारची सत्ता असून देखील त्यांचे प्रश्न ज्यांच्याकडून सुटले नाही ते पुन्हा एकदा अतिक्रमण काढणाऱ्या व्यावसायिकांबद्दल खोटा कळवळा दाखवत आहे अशी टीका विवेक कोल्हे यांचे नाव न घेता हाजी मेहमूद सय्यद यांनी केली आहे.
कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने शहरात शासकीय जागेवरील अतिक्रमणे काढण्याची नियमित कारवाई सुरु आहे. ज्या गोरगरीब छोट्या व्यावसायिकांना व्यवसायाशिवाय उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नाही व ज्यांच्याकडे व्यवसायासाठी दुसरी जागा नाही अशा व्यावसायिकांसाठी कोपरगाव नगरपरिषद त्यांच्या पातळीवर योग्य निर्णय घेणार आहे. मात्र काही व्यक्ती या गोर-गरीब व्यवसायिकांच्या भावनांशी खेळून आपली राजकीय पोळी भाजण्याचा करीत असलेला प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे.
२०१० पासून कोपरगाव शहरातील विस्थापित झालेल्या व्यावसायिकांना आजपर्यंत कुणीही न्याय देवू शकले नाही. नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सद्यस्थितीला शासकीय जागेवरील व रहदारीला अडचण ठरणारे अतिक्रमण काढले जात आहेत. २०१० साली देखील पालिका प्रशासनाने अशा प्रकारे अतिक्रमण काढली होती. हि पालिकेची नियमित कारवाई असून प्रत्येक शहरातील पालिका प्रशासन अतिक्रमण काढत असते. अशीच कारवाई संगमनेर शहरात देखील सध्या सुरु असून तो पालिका प्रशासनाच्या कामाचा भाग आहे. मात्र काही महाभाग या व्यावसायिकांच्या भावनेशी खेळून आपली राजकीय पोळी शेकावण्याचा प्रयत्न करीत आहे.
२०१४ साली त्यांनी विस्थापितांबाबत अशीच खोटी सहानुभूती दाखवून त्यांनी आमदारकी पदरात पाडून घेतली. त्यांच्याकडे पालिकेबरोबरच सर्व प्रकारची सत्ता होती. केंद्रात, राज्यात त्यांच्या पक्षाचे सरकार होते. त्यांनी व त्यांच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी व मंत्र्यांकडे केवळ बैठकींचे देखावे करून विस्थापितांना आजपर्यंत झुलवत ठेवले आहे.एवढेच काय याबाबत ते त्यावेळी तात्कालीन मुख्यमंत्र्यांना देखील भेटून आले होते तरीदेखील हा प्रश्न ते व त्यांचे कुटुंबीय सोडवू शकले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठकीचा देखावा करून विस्थापितांची दिशाभूल करून सर्व पक्षीयांची बैठक घेण्याचा कांगावा करण्यात येत आहे. यापूर्वी अशा अनेक बैठका त्यांनी घेतल्या असून त्यातून विस्थापितांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे सर्व पक्षीयांच्या बैठकीचा कांगावा सपशेल लोकांना वेड्यात काढण्याचा प्रकार आहे. यातून काहीही निष्पन्न होणार नाही. जनता सुज्ञ आहे त्यामुळे आपण कितीही कांगावा केला तरी तुम्ही करीत असलेल्या नौटंकीला जनता बळी पडणार नाही. सर्व प्रकारची सत्ता असतांना देखील जे विस्थापितांना न्याय देवू शकले नाही त्यांनी विस्थापितांच्या भावनांशी खेळून आपली राजकीय पोळी भाजू नये असा सल्ला विवेक कोल्हे यांचे नाव न घेता हाजी मेहमूद सय्यद यांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत