कोपरगाव प्रतिनिधी :- मागील दोन वर्ष जीवघेण्या कोरोना संकटाचा यशस्वी सामना करून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी...
कोपरगाव प्रतिनिधी :-
मागील दोन वर्ष जीवघेण्या कोरोना संकटाचा यशस्वी सामना करून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी २०२२-२३ चा मांडलेला अर्थसंकल्प सर्वच घटकांना न्याय देणारा व राज्याला विकासाकडे घेवून जाणारा विकासाभिमुख अर्थसंकल्प असल्याचे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
मागील दोन वर्ष संपूर्ण विश्वासाठी अतिशय अडचणीची होती. नागरिकांचा जीव वाचविण्या बरोबरच रुळावरून घसरलेली अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर घेवून येणे हे मोठे आव्हान होते. मात्र आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर अर्थव्यवस्था अडचणीत असतांना देखील राज्याचे अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी राज्याला विकासाच्या वाटेवर ठेवण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पात सर्वच घटकांना न्याय दिला आहे. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजारांऐवजी ७५ हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. शेततळ्याच्या अनुदानात देखील वाढ करून ७५ हजार केले आहे. जलसंपदा विभागासाठी १३ हजार २५२ कोटीची तरतूद केल्यामुळे अनेक रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती मिळणार आहे. ३ लाख ३० हजार नोकऱ्या निर्माण करण्यात येणार असल्यामुळे बेरोजगार तरुणाईसाठी हा समाधानकारक निर्णय आहे. ६० हजार कृषी पंपांना वीज जोड देण्यात येणार आहे. सर्वच जिल्ह्यात महिला रुग्णालय व प्रत्येक जिल्ह्यात टेली मेडीसीन रुग्णालय उभारणार आहे. तसेच शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांचेकडे केलेल्या पाठपुराव्यातून शिर्डी विमानतळासाठी १५० कोटी रुपये देणार असल्याचे अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या विमानतळाचे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत. एकूणच कृषी, आरोग्य, उच्च व तंत्र शिक्षण, क्रीडा, ग्रामविकास, नगरविकास, ऊर्जा, सांस्कृतिक, पर्यटन आदी सर्व विभागासाठी निधीची तरतूद असलेला विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांचे मतदार संघातील जनतेच्या वतीने ना. आशुतोष काळे यांनी जाहीर आभार मानले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत