राहुरी ः वेबटीम राहुरी तालुक्याचे लक्ष लागलेल्या उंबरे सोसायटीचा प्रचार संपला. दोन्ही सांगता सभांनी उच्चांक गाठला होता. या सभांमध्ये स...
राहुरी ः वेबटीम
राहुरी तालुक्याचे लक्ष लागलेल्या उंबरे सोसायटीचा प्रचार संपला. दोन्ही सांगता सभांनी उच्चांक गाठला होता. या सभांमध्ये सत्ताधार्यांना आम्हीच सत्तेवर येणार हा विश्वास आहे, तर विरोधकांनाही आमच्याकडेच सभासद सोसायटी देणार, हा आत्मविश्वास आहे. मात्र, प्रत्येक निवडणुकीत चाणाक्ष, चतूर आणि हुश्शारीने मतदान करणारे उंबरेकर सभासद यावेळी मतपेटीतून नेमका कुणाचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करणार, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.दरम्यान, क्रॉस ओटिंगमधूनही धरसोड होण्याची भीती दोन्ही मंडळातील उमेदवारांना आहे, तसा अनुभव पाठीशी असल्याने सर्व उमेदवार एकमेकांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.
उंबरे सोसायटी ही कारखान्याचे माजी संचालक सुनील आडसुरे यांच्या ताब्यात आहे. यावेळी त्यांना तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेव ढोकणे यांची रसद मिळणार असल्याने त्यांच्या गटाला विजयाची खात्री वाटत आहे. तसेच त्यांनी जुनेजानते आणि गठ्ठ्यातील मते असलेल्या बड्या दिग्गजांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांचे पारडे जड वाटत असले तरी दुसरीकडे कारखान्याचे माजी संचालक साहेबराव दुशिंग, नवनाथ पाटील ढोकणे, कारभारी ढोकणे, गोरक्षनाथ दुशिंग यांनीही आपल्याकडून तुल्यबळ उमेदवार दिल्याने टफ फाईट लागली आहे. त्यांनी विरोधी दिग्गजांच्या समोर आपले नवे मात्र तरूण चेहरे जनतेसमोर उभे केले आहेत.त्यांच्याकडेही मतांची गोळाबेरीज आहे, त्यामुळे त्यांच्याकडेही धक्कादायक निकाल लावण्याची ताकद आहे.
प्रचारात दोन्ही मंडळांनी भर उन्हातान्हात वाड्यावस्त्यांवर जाऊन सभासद मतदारांचे आशीर्वाद घेतले आहे. चतूर सभासद हे दोन्ही पार्ट्यांना आम्ही तुमचेच काम करणार आहे, असे सांगत आहेत. मात्र ते मतपेटीतून नेमकं कुणाचे ‘काम’ करणार, हे निकालानंतरच दिसणार आहे. उद्या सकाळपासून मतदान सुरू होणार आहे. सायंकाळी 4 नंतर मतमोजणी सुरू होणार आहे. दोन्ही मंडळांच्या नेत्यांनी शांततेत मतदान पार पडावे, यासाठी कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या आहेत.
या निवडणुकीत तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेव ढोकणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आडसुरेंच्या मदतीने ते सोसायटीवरील सत्ता विरोधकांकडे जाऊ नये. यासाठी त्यांनी तसे नियोजनही केले आहे. तर विरोधकांनी आपल्या अनुभवाने नात्यागोत्याचे उमेदवार देवून डावपेच टाकले आहेत.त्यांना गावासह बाहेरहुन देखील छुपी मदत चालू झाली आहे. त्यामुळे निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी जिंकले तर विरोधकांचे पुढे राजकारण अवघड होईल, आणि जर सत्ताधार्यांचा पराभव होणारा धक्कादायक निकाल लागला, तर तालुक्याचे राजकारण फिरणार आहे. त्यामुळे सभासद नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत