श्रीरामपूर/वेबटीम:- अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ निर्मित ‘किल्ले पाहिलेला माणूस’ हा माहितीपट नुकताच श्रीरामपूर येथील यशवंतराव चव्हाण सभ...
श्रीरामपूर/वेबटीम:-
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ निर्मित ‘किल्ले पाहिलेला माणूस’ हा माहितीपट नुकताच श्रीरामपूर येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात तहसीलदार प्रशांत पाटील, नगर जिल्ह्याची हिरकणी अर्चना गडधे, श्रीशक्ती गृपच्या अध्यक्षा दिपाली ससाणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला. यासाठी श्रीरामपूर येथील सह्याद्री ट्रेकर्सच्या गिर्यारोहकांनी विशेष प्रयत्न केले.
गोपाल नीलकंठ दांडेकर यांना महाराष्ट्राचे गोनीदा या टोपण नावाने ओळखले जाते. ते मराठीतले एक अग्रगण्य कादंबरीकार तसेच गडदुर्ग प्रेमी म्हणून परिचित आहेत. शिवछत्रपतींबद्दल नितांत आदर असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील जवळपास सर्वच किल्ले पाहिले. या किल्ल्यांच्या भटकंतीच्या अनुभवातून त्यांनी किल्ले, दुर्गभ्रमणगाथा, दुर्गदर्शन, शिवतीर्थ रायगड अशी पुस्तके लिहिली. यामुळे हजारो वाचकांना त्यांच्या लेखनातून दुर्गदर्शनाची प्रेरणा मिळाली आहे. गोनीदांचे दुर्गसंस्कार नवीन पिढीला माहित व्हावे आणि गड-किल्ले मौजमजेचे स्थान नसून स्फूर्तीस्थाने आहेत असा उद्देश घेऊन हा माहितीपट अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने निर्मित केला आहे. या कार्यासाठी संयोजन समिती, कार्यकारी समिती महासंघाने गठीत केली होती. यामध्ये अध्यक्ष उमेश झिरपे, कार्याध्यक्ष ऋषिकेश यादव, सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, विजय जोशी, ऍड. रवी परांजपे, अभिजित बेल्हेकर आदींचा समावेश आहे. हा माहितीपट नगर जिल्ह्यात प्रथमच श्रीरामपूर सारख्या ग्रामीण भागात प्रसारित करण्यात आला.
यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपण ह्या नवीन पिढीला आपला लुप्त होत चाललेला इतिहास पुस्तके, भटकंती करून माहीत करून द्यायला पाहिजे. त्यानंतर नगर जिल्ह्याची हिरकणी अर्चना गडदे हिने तिचा गिर्यारोहण जीवन प्रवास सर्वांसमोर उलगडला. सह्याद्री ट्रेकर्सच्या सदस्या दिपाली ससाणे यांनी ट्रेकिंगमधील समस्या यावर काय उपाययोजना येईल याबाबत आपले मत मांडले. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना सचिन भांड, सूत्रसंचालन शुभम केनेकर तर आभार निर्मला चंदन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सह्याद्री ट्रेकर्सच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत