देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या हद्दीत खा.सदाशिव लोखंडे यांच्या निधीतून स्व. बाळासाहेब ठाकरे योगाभवनासाठी ८० लाख रु...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या हद्दीत खा.सदाशिव लोखंडे यांच्या निधीतून स्व. बाळासाहेब ठाकरे योगाभवनासाठी ८० लाख रुपयांची मंजुरी मिळाली असून योगाभवन उभारण्याच्या जागेवरून राजकीय षड्यंत्र सुरू झाले असून काहीजण देवळाली प्रवरात योगाभवन होण्यासाठी तर काही जणांनी राहुरी फॅक्टरी येथे योगभवन होण्यासाठी हट्ट धरला आहे. या राजकीय षडयंत्रात योगाभवनाचे काम होईल की नाही याबाबत योग अभ्यासकांमध्ये संशयाची सुई निर्माण झाली आहे.
देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीत खा. लोखंडे यांच्या ८० रुपये निधीतून स्व. बाळासाहेब ठाकरे योगभवन उभारण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. या योगाभवनासाठी जागेसह प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याने योगाभवनाचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. परन्तु राजकिय षडयंत्रातून देवळाली व फॅक्टरीचा दुजाभाव अद्याप सुरू असून योगभवनासाठी देवळाली प्रवरात पुरेसे प्रमाणात जागा न मिळाल्याने नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी वैष्णवी चौकशेजारी स्वदेशनगरमध्ये पुरेसा प्रमाणात जागा उपलब्ध झाल्याने योगभवनाचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतासाठी पाठविला होता. जागेसह प्रशासकिय राहुरी फॅक्टरी येथील स्वदेशनगर येथे उभारण्यास मंजुरी मिळाली असल्याने ८० लाख रुपयांचे काम राहुरी फॅक्टरी येथे जाणार असल्याने राजकिय षड्यंत्र जागे झाले आहे.
खा. सदाशिव लोखंडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास विभागाकडे सामाजिक कार्यकर्ते देवळाली येथील दत्ता कडू यांनी लेखी तक्रार केली आहे. सदर प्रशासकीय मान्यता मिळालेल्या जागेवर योगभवन उभारू नये, योगभवनापासून काही अंतरावर समशानभूमी व मळीचे टॅंक असल्याने या योगभवनात योगा करण्यासाठी कोणी जाणार नाही.त्यामुळे अशा ठिकाणी योगभवनाची वास्तू उभारू नये अशी तक्रार कडू यांनी केली आहे.
देवळाली नगरपालिका हद्दीत योग भवन बांधण्यासाठी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी वर्षभरापूर्वी खा.लोखंडे यांच्याकडून ८० लाख रुपये मंजूर करून घेतले आहे. देवळाली व राहुरी फॅक्टरी येथील नागरिकांना समान अंतरावर योगभवन उभारण्यासाठी वैष्णवी चौक लगत स्वदेशनगरमधील जागा निवडण्यात आली आहे. वैष्णवी चौक, अंबिकानगर, कारखाना कॉलनी, वृदांवन कॉलनी, म्हसे कॉलनी आदीपासून समान अंतरावर हे योगभवन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १७ ते १८ गुंठे जागा पालिकेच्या मालकीची मोकळी जागा आहे. देवळाली प्रवरात योगभवन उभारणीसाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध नसल्याने पर्यायी जागा म्हणून स्वदेशनगरमध्ये पालिकेच्या मालकीची जागा निवडण्यात आली आहे.
योगभवना संदर्भात आगामी निवडणूक डोळ्यासमोर राजकीय षड्यंत्रातून मुख्यमंत्री, नगरविकास खाते व खा. लोखंडे यांच्याकडे तक्रारी केल्या असल्या तरी सध्याचे नगरपालिकेचे प्रशासकीय मंडळ राजकिय दबावाला बळी न पडता स्व. बाळासाहेब ठाकरे या नावाने भव्य-दिव्य असे योगभवन मंजूर झालेल्या ठिकाणीच उभारले जाईल . राजकीय षडयंत्रातून योगभवनाची जागा बदलण्याचा प्रयत्न झाला तर त्याविरोधात फॅक्टरी येथील नागरिकांना सोबत घेऊन मोठा लढा उभारण्यात येईल असा इशारा परिसरातील नागरिक वसंत कदम यांनी दिला आहे.
याबाबत मुख्याधिकारी अजित निकत यांच्याशी संपर्क साधून योगभवनाच्या राजकीय षडयंत्राबाबत विचारले असता ते म्हणाले की, योगभवन हे राहुरी फॅक्टरी वृदांवन कॉलनी येथील मोकळ्या जागेत उभारण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता.परंतु योग भवनाच्या मोजमापानुसार वृंदावन कॉलनी येथे पुरेशा प्रमाणात जागा नसल्याने तो प्रस्ताव नामंजूर झाला होता. नव्याने योग भवनासाठी जागेचा शोध घेतला असता देवळाली प्रवरा येथे २० गुंठ्यांची मोकळी जागा शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याप्रमाणात जागा उपलब्ध होऊ शकली नाही. राहुरी फॅक्टरी येथील स्वदेशनगरमध्ये पालिकेच्या मालकीची १८ गुंठे मोकळी जागा उपलब्ध असल्याने त्याठिकाणी योगाभवन उभारण्याचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविला होता. सर्व बाबी तपासूनच योगभवनासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.प्रशासकीय मान्यतेनुसार त्याच जागेवर योगभवना बांधावे लागणार आहे. काही प्रतिष्ठीत नागरिकांनी योगा भवन तेथे बांधू नये अशी मागणी केली आहे. परंतु उपलब्ध जागेनूसार व प्रशासकीय मान्यतेनुसार स्वदेश नगर येथे बांधावे लागणार असल्याचे मुख्याधिकारी निकत यांनी सांगितले.
योगाभवनाबाबत सोशल मीडियावरून वाद-प्रत्यारोप सुरू झाले असून या वादामुळे योगाभवनाला सोशल मीडियाला चांगलीच प्रसिद्धी मिळू लागली आहे. राजकिय सूडभावनेतून व आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सोशल मीडियावरून वाद व प्रत्यारोप सुरू झाल्याने देवळाली व फॅक्टरी हा दुजाभाव सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आला आहे. काही वर्षांपूर्वी देवळाली प्रवरा नगरपालिका सत्ताधारी गट विकास कामाबाबत राहुरी फॅक्टरीवर अन्याय करत असल्याची चर्चा जोर धरू लागली होती.परंतु गेल्या दोन-तीन पंचवार्षिक पासून देवळाली पेक्षा सर्वाधिक विकासकामे राहुरी फॅक्टरीभागात करण्यात आल्याचे त्यावेळचे सत्ताधारी राजकीय नेते आपल्या भाषणातून उघडपणे सांगत होते.परंतु यावेळी मात्र राजकिय आखाडा तापण्यापूर्वीच फॅक्टरी व देवळालीचा दुजाभाव राजकिय षडयंञातुन चव्हाट्यावर आणला जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत