राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील एका 55 वर्षीय महिलेस बळजबरीने दमदाटी करून धर्मांतर करण्यास भाग पाडणाऱ्या विरुद्ध कारवाई...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील एका 55 वर्षीय महिलेस बळजबरीने दमदाटी करून धर्मांतर करण्यास भाग पाडणाऱ्या विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी सदर महिलेने अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ब्राम्हणी येथील मीराबाई हरेल यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मीविधवा असून माझा मुलगा, सून व नातू रोजी रोटीच्या कामानिमित्त बाहेरगावी असतात. मी गावात एकटीच राहते. भाजी विक्रीचा व्यवसाय करते.
रेवह. कमलसिंग (पंजाब) हे काही लोकांसोबत लाल रंगाच्या चारचाकी वाहनातून माझ्या भाजी विक्रीच्या गाडीवर आले होते. तेव्हा रेव्ह. कमल सिंग याने स्वत:चे नाव गाव सांगत तो मोठा सामाजिक कार्यकर्ता असून गोर गरीबांची मदत करतो असे मला सांगितले. मला काही आजार आहे का पैशांची अडचण आहे का, असे विचारले. तसेच रविवारी माझ्याकडे या, मी तुमचा आजार बरा करतो आणि तुम्हाला दरमहा दोन हजार रुपये मदत करतो, असे आमिष दाखविले. त्यानुसार मी ब्राम्हणी गावातील तळयाजवळ रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास गेले.
माझ्या तळपायाला आग होत असल्याचे मी रेव्ह. कमल सिंग यांना सांगितले. त्यावेळी मी येशू देवाच्या आशीर्वादाने मंत्र टाकून मंतरलेले तेल तुम्हाला देतो. ते लावल्यावर तुम्हाला आराम वाटेल. असे सांगत रेव्ह. कमल सिंग याने एका बाटलीवर काहीतरी पुटपुटत मंत्र मारुन ती तेलाची बाटली मला दिली. तसेच तुम्हाला या आणि सगळयाच दुखण्यांतून कायमचे बरे व्हायचे असेल तर आंघोळ करावी लागेल. तेव्हा मी मंत्रोच्चार करील आणि तुम्ही बऱ्या व्हाल असे म्हणत मला तळयाजवळ नेले. तळयातील गुडघाभर पाण्यामध्ये मी अंघोळीसाठी गेले असता रेवह. कमल सिंग याने अचानक माझ्या पाठीमागून येऊन माझ्या दोन्ही खांद्यांना धरुन मला बळजबरीने पाण्यात बसविले. असे तीन चार वेळेस केले. अचानक पाण्यात पडल्यामुळे मला काहीही सुधारे पर्यंतच रेव्ह. कमल सिंग याने माझ्या अंगाला त्याचे अंग घासत मला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. मी स्वत:ला कमल सिंग यांच्या तावडीतून सोडवून घेत पाण्याबाहेर येत तत्काळ घरी निघाले. त्यावेळी मला आडवत हालेलुया हालेलुया असे मोठ मोठयाने ओरडून आता तुम्ही ख्रिश्चन झाल्या, असे म्हणत कमल सिंग याने मला गळयातले व कानातले दागिने काढायला सांगितले. पण मला तो प्रकार ती घटना पटलेली नव्हती व मला धर्मांतर करायचे नव्हते. तरीही कमल सिंग मला तुम्ही ख्रिश्चन झाल्या असे ओरडून, दमदाटीकरुन सांगू लागला. त्यामुळे लोक जमा झाले. कोणीतरी पोलिसांना फोन करुन बोलावून घेतले. राहूरीवरुन पोलिसांच्या गाडया ब्राम्हणीमध्ये आल्या. त्यावेळी मी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. मात्र जमावाला शांत करुन पोलिस निघून गेले.
कमल सिंग याने माझ्या अंगाला केलेला स्पर्ष माझा केलेला विनयभंग आणि बळजबरीने केलेले धर्मांतर, त्यासाठी केलेला जादूटोणा असा सर्व प्रकार मला असहय झाल्यामुळे मी पोलिसांना मदत मागायचे ठरवून सोमवारी दि. ०४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत राहूरी पोलिस ठाण्यात गेले. ठाणे अंमदलार भोसले यांना भेटून झालेली घटना सांगितली. तेव्हा तुम्ही साहेबांना भेटा मग फिर्याद घेतो. असे ठाणे अंमलदार भोसले यांनी मला सांगितले. मी साहेबांची वाट पहात पोलिस स्टेशनमध्ये थांबले. तास दीड तासांनी श्री.दराडे पोलिस स्टेशनमध्ये आले. तेव्हा मी घडलेली हकीगत त्यांना सांगितली. त्यावेळी तुम्ही बाहेर बसा, मी गुन्हा दाखल करायला सांगतो. असे म्हणत दराडे यांनी मला बाहेर बसण्यास सांगितले. संध्याकाळी सहा ते साडेसहा वाजेपर्यंत मी पोलिस स्टेशनमध्येच होते. त्यावेळी मी पुन्हा दराडे यांना माझी तक्रार नोंदविण्याची विनंती केली. तेव्हा समोरची पार्टी आली आहे. तुमची तक्रार घेतली, तर तुमच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा ते दाखल करुन तुम्हाला इथेच अटक केली जाईल. असे दराडे साहेबांनी मला सांगत भिती घातली. मला अटक नको असेल, तर कोऱ्या कागदावर सही करावी लागेल अशी धमकी दिली. अटकेच्या भितीने मी कोऱ्या कागदावर सही करुन पोलिस स्टेशनमधून घरी निघून गेले. तरी, कमलसिंग याने मला पाण्यात बुडवत माझ्या अंगाला घाणेरडया हेतूने केलेला स्पर्ष, माझा झालेला विनयभंग, माझे बळजबरीने धर्मांतर केल्याचे जाहीरपणे ओरडून सांगत मला घाबरवीत.माझ्यावर जादूटोणा केल्याने मी घाबरलेल्या अवस्थेत मी आरडा ओरडा केल्यानंतर पोलिस गावात येऊन देखील कोणतीही कारवाई न करता परत गेले व माझ्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराविरुध्द दाद मागण्यास मी राहूरी पोलिस स्टेशनला गेले असता मला दिवसभर विना अन्न पाण्याचे बसवून ठेवत संध्याकाळी माझ्यावरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन अटकेची धमकी देत दराडे साहेबांनी माझ्या कोऱ्या कागदावर सहया घेतल्या असून कमल सिंग याने माझ्यावर केलेल्या अत्याचारास पाठबळ देत त्याला कायदेशीर कारवाईपासून वाचवत दराडे साहेबांनी माझ्यावरच अन्याय केला आहे. हे सर्व सीसीटिव्ही मध्ये रेकॉर्ड झाले आहे. त्यामूळे वरील सर्वांविरोधात माझी फिर्याद असून या प्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करुन सीसीटिव्ही फुटेज जप्त करुन सर्वांवर कायदेशीर कारवाई अशी मागणी मीराबाई हरेल यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत