दवणगाव-देवळाली रस्ता गेला खड्ड्यात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

दवणगाव-देवळाली रस्ता गेला खड्ड्यात

आंबी(संदीप पाळंदे) राहुरी तालुक्यातील दवणगाव-देवळाली प्रवरा या वर्दळीच्या चार किमी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर...

आंबी(संदीप पाळंदे)


राहुरी तालुक्यातील दवणगाव-देवळाली प्रवरा या वर्दळीच्या चार किमी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोठ-मोठे खड्डे पडले असून या रस्त्यावरून प्रवास करणे कठीण झाले आहे. त्यातच पावसाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांना या खड्ड्यातील घाण पाण्यातून वाट काढत शाळा गाठावी लागत आहे.



         दवणगाव-देवळाली प्रवरा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वसलेली आहे. येथील लोकांचा शेती, दुग्ध व्यवसाय हे मुख्य उद्योग आहे. राहुरी, देवळाली प्रवरा बाजारपेठेशी शेतकऱ्यांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र दुरवस्था झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल वेळेवर बाजारात नेता येत नसल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.  याकडे जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधी यांनीही दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. तसेच अवजड वाहनांमुळे आधीच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे वाहतुकीला 'ब्रेक' लावत असून वाहनचालकांचे कंबरडे मोडत आहेत. त्यामुळे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हे वाहन धारकांना समजेनासे झाले आहे. 

      शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी, दिव्यांग, रुग्ण यांना दळणवळणासाठी याच रस्त्याचा नियमित वापर करावा लागतो. खड्यांचा अंदाज येत नसल्याने रोजच छोटे-मोठे अपघात नित्याचे झाले आहेत. त्यामुळे या खराब रस्त्यावरून प्रवाशांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. खड्यात वाहने आदळून अनेकांना कमरेचे, मणक्याचे, हाडाचे विकार जडल्याने मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे अशी मागणी दवणगाव ग्रामस्थांसह प्रवासी वर्गातून होत आहे.



“दवणगाव-देवळाली प्रवरा रस्त्याची मोठ्या प्रमाणत दुरवस्था झाली आहे. ग्रामपंचायतने रस्त्याच्या कामासंदर्भात ठराव घेऊन या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून काम व्हावे यासाठी खासदार सदाशिवराव लोखंडे व आमदार लहुजी कानडे यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.”

- मेजर भाऊसाहेब खपके (सरपंच दवणगाव)

      


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत