श्रीरामपूर(प्रतिनिधी) मतदारांमध्ये मतदान व निवडणुकांविषयी जागृती वाढावी यासाठी मा. भारत निवडणूक आयोगाने मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणू...
श्रीरामपूर(प्रतिनिधी)
मतदारांमध्ये मतदान व निवडणुकांविषयी जागृती वाढावी यासाठी मा. भारत निवडणूक आयोगाने मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग अर्थात 'स्वीप' हा पथदर्शी उपक्रम हाती घेतला असून श्रीरामपूर मतदारसंघात त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येईल असे प्रतिपादन श्रीरामपूरचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुक्यात निवडणूक शाखेमार्फत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या आगामी दौऱ्याच्या अनुषंगाने तालुका स्तरीय स्वीप कमिटीची बैठक तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी स्वीप अंतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या निवडणूक व मतदार जागृती कामकाजाचा सखोल आढावा घेऊन सूचना दिल्या.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने मतदार जागृती मंच स्थापन करणे, नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणे, शाळा, महाविद्यालय, ग्राम पातळीवर चुनाव पाठशाळांचे आयोजन करणे, तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करणे, राष्ट्रीय मतदार दिन, महिला दिन, अपंग दिन, तृतीयपंथी दिन यांसारख्या विशेष कार्यक्रमांकरिता आवश्यक पूर्व तयारी करणे अशा विविध महत्वाच्या विषयांबाबत तहसीलदार पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर स्वीप कक्षाच्या वतीने तालुक्यातील स्वीपचे नोडल अधिकारी, बीएलओ, शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांची बैठक आयोजित करून मार्गदर्शन करण्यात आले.
याकामी निवडणूक शाखेत मतदार मदत केंद्र स्थापन करण्यात आले असून निवडणूक नायब तहसीलदार हेमलता वाकडे, अव्वल कारकून अर्जुन सानप, महसूल सहायक संदिप खाडे, स्वीप समनव्यक शकील बागवान, संदिप पाळंदे हे कामकाज पाहत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत