विदर्भ संतांची नगरी..... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विदर्भ संतांची नगरी.....

विदर्भ जाणून घेण्याची आस मला कायमच होती. माझे विदर्भ दर्शन घडले ते माझ्या मामामुळं.  विपुल प्रमाणात  दर्भ उगवणारा प्रदेश  तो विदर्भ अशी या न...



विदर्भ जाणून घेण्याची आस मला कायमच होती. माझे विदर्भ दर्शन घडले ते माझ्या मामामुळं.  विपुल प्रमाणात  दर्भ उगवणारा प्रदेश  तो विदर्भ अशी या नावाची व्युत्पत्ती आहे. विदर्भ हा बघून समजत नाही तर तो अनुभवता आला पाहिजे. विदर्भ अनुभवता येतो  तो संतांच्या रुपात आणि ऐतिहासिक पराक्रमाने. 



आपल्या सगळ्यांना वाटते की,संत हे फक्त  भजन , कीर्तन, तप  करतात पण खरं म्हणजे संतांशिवाय जगकल्याणाचा विचार कुणीही करत नाही. आपल्याना पाण्यावरून तळ्याच्या खोलीचा अंदाज लावता येत नाही त्यासाठी तळालाच जावे लागते. पुणे ते अमरावती १२ तासाचा प्रवास करून मी  मामासोबत पिंपळखुंट्याला आले. मनात खूप प्रश्न होते आपण का तिकडे चाललो? पण एक गोष्ट  नक्की माहीत होती की, हे मामाचे गुरू आहेत, मामाचे सर्वस्व!!!!


पिंपळखुट्याला  गेल्यावर आश्रम बघून मी मंत्रमुग्ध झाली. जस अमवस्याच्या रात्री  काजव्यांनी जंगलात फिरून त्यांच्या प्रकाशाने  जंगल प्रकाशमय करावं आणि मानवाला धीर द्यावा तसेच संतही!!!


श्री संत शंकर बाबा हे जिवंत उदाहरण आहे लोक कल्याणाचे, लोकांच्या समस्या निवारण करण्याचे.



                संत शंकर बाबा

कलियुगातील संत मला डोळ्यांनी बघायला भेटला हे माझे भाग्यच!!! त्यांनी फक्त आश्रमच नाहीतर शाळा, कॉलेज, agriculture कॉलेज , गरीब रुग्णासाठी  दवाखाना,  गायांसाठी गो-शाळा बांधली आहे.  फ्रेश झाल्यानंतर श्री संत शंकर महाराजांचे दर्शन  घेण्यास गेले. 

थोड्या वेळासाठी डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता की, आजही असे संत आहे की, जनकल्याणासाठी  आपले प्राण पणाला लावतात. श्री संत शंकर महाराज यांच्या डोळ्यात संपूर्ण विश्व सामावलेले आहे. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानच हास्य होत. वाणी जणू अमृतासमान. अस वाटत होते की, ते काठीचा आधार नव्हते घेत काठीला ते  आधार देत होते. 

चंदनाच्या झाडाला कितीही लपवले तरी त्याचा सुगंध सगळीकडे दरवळतो तसेच श्री  शंकर महाराज चंदनच!!!

 सन १९६८ साली  श्री लहानुजी नाथांनी श्री शंकर बाबांकडून " ज्ञानमृत"  हा ६०० पानांचा ग्रंथ लिहुन घेतला.



भक्तगणांचे विठ्ठल हे पिंपळखुट्यालाच राहतात कारण प्रत्येक माणसाच्या डोळ्यातील भावना ही वेगळीच होती. विठ्ठलासारखं स्थान त्यांच्या मनात श्री शंकर बाबा यांच्यासाठी आहे.त्यातच मला एक अभंग आठवला;


पंढरपूरचे निर्मळ दैवत आहे आमुच्या घरी।

वाडवडीलास त्याची चाकरी।।

खांदी पताका हाती टाळ अन गळा माळ तुळशीची।

मुखी नामावली  पंढरीची।।

आजे-पणजे  वारीच करीता पंढरीस। अर्पिले विठुच्या दरबारी ठेवले।।


जेव्हा सत्याला अविनाशच कुलूप लागत तेव्हा  संत चावी बनून येतात. पंढरपूरला जाण्यासाठी पालखी निघणार होती त्यामुळे श्री संत शंकर महाराजांचे  गुरु त्यांच्या दर्शनास निघालो.

मामाला विदर्भ  चांगलाच ओळखत होता. विदर्भ आणि मामाचे नाते जसे जन्मत्तरीचे!!! 

प्रत्येक गोष्ट मामा मला समजून सांगत होते. मधेच वर्धा नदीपाशी आम्हाला कोंढण्यपूर लागले. मामा सांगू लागले की,  महाभारतातील कथेप्रमाणे विदर्भ हा आर्यावर्तातला[६] देश होता. ज्याची राजधानी अमरावतीजवळील कुंडिनपूर - सध्याचे कौंडिण्यपुर- येथे होती. वैदिक काळानंतरच्या महा-जनपदात विदर्भाचा समावेश होता. पुराणातील अनेक कथा विदर्भाशी निगडित आहेत त्या खालीलप्रमाणे -


अगस्त्य व लोपामुद्राचा विवाह


महाभारतातील रुक्मिणीहरण - विदर्भाची राजकन्या रुक्मिणी हिने मनोमन कृष्णाला वरले होते. मनाविरुद्ध होत असलेल्या आपल्या लग्नाची बातमी व कृष्णाबद्दलच्या भावना तिने कृष्णापर्यंत पोहोचवल्या. तिने कृष्णाला तिला पळवून नेण्याची विनंती केली होती. कृष्णाने रुक्मिणीची विनंती मान्य केली व तिचे हरण केले व विदर्भ राजकुमार रुक्मी याचा पराभव केला.


प्रसिद्ध नल दमयंतीची कथाही विदर्भ राज्याशी निगडित आहे.


कालिदासाच्या मेघदूतात विदर्भाचा, यक्ष-गंधर्वाची वनवासाची जागा म्हणून नोंद आहे.


महाभारतातील पांडवांचा अज्ञातवास विदर्भात व्यतीत झाला. कीचकवध अमरावती जवळील किचकदरा येथे झाला असा उल्लेख आढळतो.


महर्षी गृत्समद यांना विदर्भातच कापसाचा शोध लागला आणि त्यांनीच कापसाच्या धाग्यापासून कापड तयार करण्याची पद्धत विकसित केली.


५ महासती होत्या. दशरथाची आई  इंदुमती यांचे जन्मस्थान , रुख्मिनी यांचे माहेर, दमयंती नल राज्याची पत्नी , भगीरथ राज्याची माता केशनी यांचे जन्मस्थान, लोपमुद्रा यांचे जन्मस्थान; लोपमुद्रा ही अगस्त्य ऋषीची पत्नी.


कोंढण्यापूर मध्ये चौरंगीनाथांची समाधी वर्धा नदीच्या काठावर विठ्ठल रुख्मिनीच्या  मंदिरासमोर आहे. त्यांचा इतिहास  हा संतांशी निगडित आहे. चौरंगीनाथ हे गोरक्षनाथ यांचे शिष्य होते. चौरंगीनाथ हे राजपुत्र होते. त्यांची आई मरण पावल्यानंतर त्यांच्या वडिलांनी  दुसरी पत्नी केली. ती तरुण होती . तिची दृष्टी तरुण राजपुत्र याच्यावर पडली. तिने राजपुत्राला आपल्या महालात बोलावलं आणि आपली काम इच्छा प्रगट केली. ते म्हणाले तू माझी माता आहे हे कृत्य माझ्याकडून होणार नाही. हे पाप मी करणार नाही असे म्हणून तिथून निघून गेले. तिला वाटले ही गोष्ट राज्याला कळली तर आपले काही खरे नाही म्हणून  तिने खोटे बोलून राज्याला सांगितले तुमचा मुलगा तरुण झालाय माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयन्त केला. राज्याने चौकशी न करता त्यांचे हात पाय तोडले व त्याला नगराबाहेर टाकून दिले. कुणीही त्याला अन्न-पाणी द्याचे नाही असं फरमान काढले. ३ दिवस तो अन्न-पाण्याविना तळमळत होते. त्यामार्गाने अचानक गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ चालले असताना त्यांचं लक्ष त्यांवरती पडले  आणि झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. जे घडलं ते गुप्त ठेवण्यास सांगितलं कारण आपल्या सावत्र आईला शिक्षा मिळेल. गोरक्षनाथ आणि मचिंद्रनाथ राज्याकडे जाऊन मागणी केली हा तुमच्या कामाचा नाही आम्ही ह्याला घेऊन जातो राज्याने परवानगी दिली.  ते त्याला घेऊन गेले व साधनेसाठी बसून दिले. पुढे जाऊन ते  नवनाथमध्ये  चौरंगीनाथ म्हणून प्रसिध्द झाले.



इतिहासाच्या पानात एवढं खोलवर गेलो की,  कधी आर्वी आली कळलंच नाही. आर्वी म्हणजे श्री संत  मायबाईची  पुण्यभूमी. मायबाईची राहणी,  वृत्ती व उदान्त आचरण लोकसेवेची कळकळ त्यांच्या भक्तीपणाची साथ देते. संतामध्ये श्री पुरुष हा भेदभाव कधीही मानला जात नाही कारण हे दोन्हीही  अंग प्रकृतीचेच आहेत. जशी आई आपल्या लेकरांच दुःख क्षणात दूर करते तसेच मायबाई ह्या अनेकांच्या माय!!!


नंतर आम्ही श्री संत शंकर महाराज यांचे गुरू श्री संत लहानुजी महाराज यांच्या पुण्यभूमीत म्हणजे टाकरखेड्याला गेलो.



श्री संत लहानुजी महाराज एका निर्धन व सच्छिल  भागवतभक्त  कुळात  जन्मलेला हा युगपुरुष.

वरवर रुद्रासारखे  परंतु आतून  परिपूर्ण कारुण्याने  भरलेले. उघड्या डोळ्यांनी विशाल देव पाहत, त्यांनी एखादया सामान्य माणसाप्रमाणे  जीवन कंठले! लाखो लोकांना  भक्तिमार्गास लावले  व शाश्वत सुखाचा मार्ग दाखवला.


त्यानंतर आम्ही  आडकुजी महाराज यांच्या दिशेने  गाडी वळवली


आर्वी-वरखेड येथे पोहचलो. पोहचल्यानंतर लगेच एका वाक्याकडे माझी नजर गेली.  ह्या पृथ्वीतलावर जे काही चालू आहे त्याचा विवाद म्हणजे हे वाक्य...

व्यापार मै धर्म करो। 

धर्म का व्यापार मत करो।।


आजच्या काळात लोक धर्मावरून भांडतात आणि येथे संतांनी सांगितलंय की सगळं काही एकच आहे. आपल्या भक्तांना कित्येक वेळेस नागाच्या रुपात दर्शन महाराजांनी दिले आहे. तेथील पालखी सोहळा हा नयनरम्य होता. त्या भजनाला अमृताची गोडी होती. संगे वारकऱ्याचा मेळा होता.


शेवटी आम्ही तुकडोजी महाराज गुरुकुंज-मोझरी येथे आलो. राष्ट्रसंताच्या  मातोश्री पूज्य माय मंजुळा मातेचं मंदिर आहे. माय मंजुळाचे  करावे तेवढे धन्यवाद कमीच! कारण त्यांनी भारताला एवढा मोठा रत्न दिला. माय मंजुळा ह्याही एक भगवंताचा अंश होत्या. खालील अभंग हा त्यासाठी अर्थपूर्ण


 तयाचे कन्यापुत्र होती जे सात्विक।

 तयाचे  हरीक वाटे देवा।।


सगळ्यात छान बाब म्हणजे  मंदिराच्या वरती लिहलेले वाक्य ते म्हणजे


सबके लिये खुला है। मंदिर यह हमारा

आओ कोई भी पंथी। आओ कोई भी धर्मी


महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संताने कधी जातीभेद वर्णभेद केला नाही जे लोक त्यांना शरण गेले त्याला त्यांनी भक्तीचा  , सुखाचा मार्ग दाखवला.

ज्याचा जीवनप्रवाह संथ वाहतो तो संत, दयाळुतेचा हिमालय म्हणजे संत , अनुभूतीचे भांडार व भक्तीचा आत्मा म्हणजे संत.

संत म्हणजे सामान्य जीवात्मा नाही. ज्याला अनंताची ओळख पटली  आणि इतरांना  ती ओळख  करून देण्यासाठी अनपेक्ष  भावनेने,  तळमळीने आणि कळवळ्याने जो प्रयत्न करतो तो संत. संताना जेवढ्या उपमा द्यावा तेवढया कमीच...!!!!!!


    मनिषा रंजना बाळासाहेब लांबे✍️

           सॉफ्टवेअर डेव्हलपर, राहुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत