सात्रळ(वेबटीम) सात्रळ, सोनगाव, धानोरे पंचक्रोशीत सलग गेल्या तीन चार दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीसदृश पावसामुळे बळीराजाचे कपाशी, सो...
सात्रळ(वेबटीम)
सात्रळ, सोनगाव, धानोरे पंचक्रोशीत सलग गेल्या तीन चार दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीसदृश पावसामुळे बळीराजाचे कपाशी, सोयाबीन, चारापिके, फळबाग पिके धोक्यात आली असून हातातोंडाशी आलेली कपाशी व सोयाबीन पिकेचे मोठया प्रमाणात नुकसान होण्याची भीती असल्याने शासनाच्या महसूल विभागाने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने फळबाग तज्ञ वसंतराव डुक्रे पाटील, रमेशराव पन्हाळे संजय नागरे, भाजपा ओबीसी युवामोर्चा सेल चे उपाध्यक्ष किरण अंत्रे, तालुका भाजप चे उपाध्यक्ष नारायण घनवट, सात्रळ ग्रुप सोसायटी चे उपाध्यक्ष अतुल ताठे, परसराम साबळे, युवा भाजप ओबीसी सेल चे ज़िल्हा सरचिटणीस बिपीन ताठे, भाऊसाहेब रतन पडघलमल, शिवाजी नालकर,सुनील नालकर आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
इरिगेशन विभागाच्या झालेल्या पर्जन्यमानाच्या आकडेवारीतून गेल्या दोन दिवसात 91 मिमी, व 72 मिमी पाऊस झालेला आहे.अतिपावसामुळे कपाशी पिकाची बोन्डेगळ, झाडे पिवळे पडणे, आलेली फुलें गळणे तसेच झाडे उभळणे, सोयाबीन पिके पिवळी पडून पाणी साचल्याने झाडे सडणे, चारापिके अतिपाण्याने खराब होणे तसेच फळबाग पिकांमध्ये फळकूज,पावसाळी वातावरणामुळे चयापचय क्रिया मंदावल्यानेफळझाडे कमजोर होणे असे प्रकारामुळे शेतकरी त्रस्त झाले असून निसर्गाच्या अवकृपेमुळे आर्थिक फटका सहन करण्याची वेळ येण्याचे चित्र सर्वत्र आढळून येत आहे. तसेच परिसरातील ओढ्यांवरील झालेल्या अतिक्रमण, बुजलेले चर अश्या मानवी चुकांमुळे ही पावसाचे पाणी वाहून जाण्यास जागा नसल्याने हे पावसाचे पाणी शेतीमध्ये साचल्यानेही बळीराजाचे नुकसान होत आहे.सदर पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या पीक पंचनामे विषयी तालुका महसूल विभागाकडील संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, अद्याप पंचनामे करण्याचे आदेश नसल्याचे माहिती दिली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत