राहुरी : वेबटीम गेल्या आठवड्यात खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी राहुरीचे पुढील आमदार हे शिवाजीराव कर्डीले असतील, असा आत्मविश्वास व्यक...
राहुरी : वेबटीम
गेल्या आठवड्यात खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी राहुरीचे पुढील आमदार हे शिवाजीराव कर्डीले असतील, असा आत्मविश्वास व्यक्त केल्याने पुन्हा एकदा कर्डीले सर्मथकांच्या जीवात जीव आला आहे, मात्र जर कर्डीले हे गेल्या निवडणुकीतच पडले नसते, तर आज ते कॅबिनेट मंत्री असते, ही सल मात्र अजूनही कार्यकर्त्यांच्या मनात कायम असल्याचे जाणवते.अडीच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांना पराभव पहावा लागला, नव्हे नव्हे तर नवख्या प्राजक्त तनपुरेंकडून राजकीय लाल मातीत नेहमी तेल लावून बसलेले पैलवान कर्डीले हे चितपट झाले. आता त्यांचा पराभव का झाला, कसा झाला, कोणी केला, यावर पुन्हा पुन्हा काथ्याकूट करण्याची गरज नाही. कारण हा विषय खूप गाजला होता, त्यामुळे यात लपवण्यासारखे देखील काही नाही, त्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले, पुढे आता ते कोसळले, आणि भाजप सत्तेत येताच कर्डीले समर्थकांना 'जर तर'ची आठवण आली, आज जर कर्डीले साहेब आमदार असते तर जिल्ह्यात जेष्ठ म्हणून त्यांनाच कॅबिनेट मंत्री पद नक्की होते, अशी भावना कार्यक्रत्ये व्यक्त करत आहेत. असो आता पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सत्कार समारंभात पुढचे आमदार कर्डीले हे असतील, असे खासदार सुजय दादांनी सांगितल्याने पुन्हा एकदा कर्डीले समर्थक आशावादी बनले आहेत, मात्र, गेल्या निवडणुकीत संधी गेल्याची आठवण अजूनही काही जात नसल्याचेही प्रखरपणे दिसते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत