श्रीरामपूर(वेबटीम) नाशिक विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी दि. ०१ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून ०७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरून देता येण...
श्रीरामपूर(वेबटीम)
नाशिक विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी दि. ०१ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून ०७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरून देता येणार आहेत. अर्हता १ नोव्हेंबर, २०२२ च्या तीन वर्षांपूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या म्हणजे १ नोव्हेंबर २०१९ पूर्वीच्या सर्व पदवीधरांना पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मतदानाची संधी मिळणार आहे. याकरिता विहीत नमुन्यातील फॉर्म क्र. १८ भरून द्यावा, असे आवाहन श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी तथा पदनिर्देशित सहायक मतदार नोंदणी अधिकारी नाशिक नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ अनिल पवार यांनी केले आहे.
मतदार नोंदणी अर्ज नमुना १८ स्वीकारण्यासाठी मतदार मदत कक्षाची स्थापना केली असून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारास आपला आधार क्रमांक मतदार नोंदणी अर्जात नमूद करता येईल. तथापि आधार क्रमांक सादर करणे हे ऐच्छिक आहे. श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात तसेच श्रीरामपूर तहसिल कार्यालयात मतदार नोंदणी अर्ज नमुना १८ स्वीकारण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे असेही प्रांताधिकारी अनिल पवार यांनी सांगितले. पात्र मतदारांनी तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, बँका आदी कार्यालयातील कार्यालय प्रमुख यांनी त्यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या पात्र पदवीधर अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून फॉर्म भरून घ्यावेत व स्वतःचा फोटो, पदवी प्रमाणपत्राच्या छायाप्रतीची स्व-साक्षांकित व पदनिर्देशित अधिकारी किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांकडून साक्षांकित केलेली प्रत आवश्यक आहे. इतर आवश्यक साक्षांकित कागदपत्रांसह अर्ज श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी कार्यालय, श्रीरामपूर तहसीलदार कार्यालय, सर्व मंडलाधिकारी कार्यालयात जमा करावेत असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा पदनिर्देशित सहायक मतदार नोंदणी अधिकारी नाशिक नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ अनिल पवार यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत