राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- कोणतीही संस्था नावलौकिकास येण्यास संस्थाचालकाएवढाच कर्मचारीही महत्वाचा असतो. शालिनतेने व प्रामाणिकपणे सेवा देऊन सर्...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
कोणतीही संस्था नावलौकिकास येण्यास संस्थाचालकाएवढाच कर्मचारीही महत्वाचा असतो. शालिनतेने व प्रामाणिकपणे सेवा देऊन सर्वांविषयी आत्मीयता ठेवून साई आदर्श मल्टीस्टेटच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यानेच या संस्थेची घोडदौड अविरतपणे सुरू असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी केले आहे.
राहुरी फॅक्टरी येथील मुख्य शाखा व जिल्ह्यामध्ये १८ शाखा असलेल्या साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेच्या कर्मचाऱ्यांना बोनस व किराणा वाटप तसेच सभासदांना १०% डिव्हिडंट वाटप कार्यक्रम नुकताच संस्थेच्या राहुरी फॅक्टरी शाखेमध्ये पार पडला. यावेळी संस्थेचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, खोलेश्वर मल्टीस्टेटचे चेअरमन दिलीप पारेकर, राजश्री शाहू पतसंस्थेचे चेअरमन वसंतराव निर्मळ, अनिल जाधव, विठ्ठल अर्बन पतसंस्थेचे चेअरमन विट्ठल गिराम, संचालक विष्णुपंत गीते, वेदांत कपाळे, किशोर थोरात, बाळासाहेब तांबे, मॅनेजर सुभाष दुशिंग ,शाखाधिकारी याकुब शेख आदिसह मान्यवर व कर्मचारी सभासद उपस्थित होते.
यावेळी बोलताना चेअरमन शिवाजीराव कपाळे म्हणाले गेल्या नऊ वर्षापासून संस्था कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्ताने बोनस देत आली आहे. कर्मचारी हा या कुटुंबाचा महत्वाचा घटक असल्याने, त्यांच्याविषयी आम्हाला मोठी आस्था नेहमी आहे. कोरोनाच्या कठीण कालावधीमध्ये आर्थिक संस्थांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले; मात्र याही कालावधीमध्ये आमच्या संस्थेने उत्तम कार्य करून दाखवले आहे. कर्मचाऱ्यांनी नेहमी शालिनतेने आत्मीयतेने प्रामाणिकपणे काम करून संस्था पुढे नेण्यासाठी सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे संस्थाचालक व कर्मचारी हे या रथाची दोन चाके आहेत. त्यांच्या योग्य वागणुकीमुळेच संस्थेची मोठी घोडदौड होत असते व संस्था झपाट्याने पुढे जात असते. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याचे काम संस्थेने नेहमी केले आहे. त्यांचे विविध प्रकारचे विमे संस्थेने उतरवले आहेत. आमची भावना व सेवा प्रामाणिक आहे. त्यामुळेच सर्वांचा विश्वास या संस्थेवर आहे. त्यातूनच १३५ कोटीच्या ठेवीचा पल्ला संस्थेने पार केला आहे. ही विश्वासहता टिकवून ठेवण्याचे काम नक्कीच केले जाईल. खोलेश्वर मल्टीस्टेटचे चेअरमन दिलीप पारेकर, यांनी शिवाजीराव कपाळे यांच्या नेतृत्वाखाली साई आदर्शचे काम अभिनंदनीय असून त्यांचे अनुकरण करून आम्ही मराठवाडयातील आमच्या संस्थाचे कामकाज करू असे सांगितले.
यावेळी वसंतराव निर्मळ, विट्ठल गिराम, संचालक विष्णुपंत गीते, शाखाधिकारी याकुब शेख यांनी देखील मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना बोनस व किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. सभासदांना डिव्हिडंट वाटप करण्यात आला. सूत्रसंचालन किशोर थोरात यांनी केले. आणि आभार विक्रम जाधव यांनी मानले.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत