राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक खासदार सुजय विखे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी प्रतिष्ठेच...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक खासदार सुजय विखे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी प्रतिष्ठेची केली होती. तनपुरे यांच्या ताब्यातून ही बाजार समिती हिसकाविण्याचा चंग विखे व कर्डिले यांनी बांधला होता. परंतु विखे-कर्डिले यांना मतदारांनी नाकारले आहे. महाविकास आघाडी अर्थात जनसेवा मंडळाने तब्बल १६ जागा जिंकल्या आहेत. भाजप अर्थात राहुरी तालुका विकास मंडळाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहेत. विखे-कर्डिले मंडळातील अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज जोरदार चुरसीचे मतदान झाले. त्यानंतर लगेच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या बाजार समितीमध्ये १८ संचालक आहेत. त्यात आमदार प्राजक्त तनपुरे व सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाला १६ जागा मिळाल्या आहेत. भाजप तथा तालुका विकास मंडळाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानवे लागले आहेत. त्यात काही जागांवर एकदम कमी फरकाने विखे-कर्डिले यांचे उमेदवार पराभूत झाले आहेत. त्यामुळे विखे गटांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती.
विखे-कर्डिले गटाचे सत्यजित कदम, शामराव निमसे हे दोघे विजयी झाले आहेत. तर तनपुरे गटाचे नारायण सोनवणे यांचा २ मतांनी पराभव झाला आहे. विखे यांचे खंदे समर्थक असलेले वांबोरीतील उदयसिंह पाटील यांना पराभवाचा जोरदार धक्का बसला आहे.
ही बाजार समिती आपल्या ताब्यात घेण्यासाठी विखे-कर्डिले यांनी जोरदार ताकद लावली होती. विखे यांनी तनपुरे घरावर वैयक्तिक आरोपही केले होते. तसेच तनपुरे यांच्या मागील संचालक मंडळातील चार संचालकही फोडले होते. राहुरीतील अनेक स्थानिक नेत्यांना हाताशी धरले होते. विखेंना कर्डिले यांची मोठी साथ होती. त्यानंतरही विखे-कर्डिले यांच्या गटाला दोनच जागा मिळाल्या आहेत. हा दोघांसाठी मोठा धक्का आहे. त्याचा परिणाम आगामी राजकारणात दिसणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत