आंबी(संदीप पाळंदे) राहुरी तालुक्यातील प्रवरा नदीवरील गंगापूर-मांडवे बंधाऱ्यावरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने बंधाऱ्यासह प्रवाशांच्या सुरक्षे...
आंबी(संदीप पाळंदे)
राहुरी तालुक्यातील प्रवरा नदीवरील गंगापूर-मांडवे बंधाऱ्यावरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने बंधाऱ्यासह प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र गंगापूर गावचे सुपुत्र व अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश भाऊसाहेब नांनोर साहेब यांनी विशेष प्रयत्न करून बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी साडे आठ लाख रुपये निधी मंजूर करून दिल्याने बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने गंगापूर व मांडवे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
सदर बंधाऱ्यावरून छोट्या-मोठ्या वाहनांसह शेकडो विद्यार्थी दररोज ये-जा करत असतात. मात्र बंधाऱ्यावरील पुलाला मोठे भगदाड पडल्यामुळे भविष्यातील जीवितहानी टाळण्यासाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद करणार असल्याचा इशारा गंगापूरचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिश खांडके यांनी दिला होता. सरपंच खांडके यांनी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करून या पुलाच्या दुरुस्तीसाठी साडे आठ लक्ष निधी मंजूर करून आणला. तसेच पावसाळ्यापूर्वी बंधारा दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभागाकडून सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी, प्रवासी यांसह गंगापूर, मांडवे ग्रामस्थांनी बंधारा दुरुस्तीचे काम वेगात सुरू केल्याने आनंद व्यक्त केला आहे. याकामी विशेष परिश्रम घेणारे गंगापूरचे सरपंच सतिश खांडके यांचे पंचक्रोशीतून अभिनंदन केले जात आहे.
"गेल्या अनेक वर्षांपासून बंधारा दुरुस्तीची मागणी होती. पुलाला मोठे भगदाड व खड्डे पडल्याने प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. याकामी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश नांनोर यांनी आमच्या मागणीला मान देऊन दुरुस्तीसाठी साडे आठ लाख रुपये निधी उपलब्ध करून देऊन प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने आनंद होत आहे."
- सतिश खांडके, सरपंच गंगापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत