पारनेर : प्रतिनिधी पारनेर शहर मुस्लिम जमातच्या शहराध्यक्षपदी राजू बशिर शेख यांची एकमताने निवड करण्यात आली. बकरी ईदच्या सामुहिक नमाजनंतर ज्य...
पारनेर : प्रतिनिधी
पारनेर शहर मुस्लिम जमातच्या शहराध्यक्षपदी राजू बशिर शेख यांची एकमताने निवड करण्यात आली. बकरी ईदच्या सामुहिक नमाजनंतर ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते डॉ. रफीक सययद यांनी शेख यांच्या नावाची सुचना केली. त्यास उपस्थित मुस्लिम बांधवांना हात वर करून पाठींबा दर्शविला.
राजू शेख हे गेल्या काही वर्षांपासून पारनेर शहराच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असून सामाजिक सलोखा राखण्यासाठी त्यांनी आजवर केलेले कार्य उल्लेखनीय आहे. पारनेर नगरपंचायतीच्या मागील वर्षी पार पडलेल्या निवडणूकीत शेख यांनी पत्नी जायदा यांना शिवसेनेच्या वतीने रिंगणात उतरविले आणि निवडणूकीत विजय संपादन केला. गेल्या वर्ष, सव्वा वर्षाच्या कालावधीमध्ये शेख यांनी नगरसेवक या नात्याने प्रभागातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला असून प्रत्येक मतदाराच्या सुख, दुःखात ते सहभागी होऊन आपले कुटूंंब या नात्याने ते प्रभागातील जनतेची सेवा करीत आहेत.
शहर मुस्लिम जमातच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानंतर राजू शेख यांनी समाजबांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आपल्यावर टाकण्यात आलेली जबाबदारी मोठी आहे, मात्र ही जबाबदारी सक्षमपणे पेलवून समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्टा करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
शेख पुढे म्हणाले, सर्वधर्मसमभावाची परंपरा पारनेर शहरात पिढयानपिढयांपासुन जपली जात आहे. ही परंपरा पुढे चालविण्यासाठी तसेच सर्वधर्मीयांचा एकोपा अधिक दृढ करण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. शहरातील नागरीक विविध जाती धर्माच्या विविध सण, उत्सावांमध्ये उस्फुर्तपणे सहभागी होत परस्परांमधील बंधुभाव वाढविण्यासाठी पुढाकार घेतात ही शहरासाठी भूषणावह बाब असल्याचेही शेख यांनी नमुद केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत