कोपरगाव(वेबटीम) सोनेवाडी परिसराला धार्मिक कामाचा वारसा लाभला असून गेल्या 39 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह सालाबाद प्रमाणे सुरू आहे. धर्माचे...
कोपरगाव(वेबटीम)
सोनेवाडी परिसराला धार्मिक कामाचा वारसा लाभला असून गेल्या 39 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह सालाबाद प्रमाणे सुरू आहे. धर्माचे रक्षण करण्यासाठी धार्मिक कार्यक्रमाची गरज असते. सोनेवाडीने ती परंपरा जोपासली असून धार्मिक कार्यक्रमामुळेच संस्कृतीची जोपासना होते असे प्रतिपादन श्रीक्षेत्र राघवेश्वर देवस्थानचे महंत राकेश्वरनंदगिरीजी महाराज यांनी केले.
ते काल नागपंचमीच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या सोनेवाडी अखंड हरिनाम सप्ताहाचे ध्वजारोहण करताना बोलत होते.
यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, भजनी मंडळ ,अखंड हरिनाम सप्ताह कमिटी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमांमध्ये संत जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत विश्वस्त रमेशगिरी महाराज यांचीही संत भेट होणार आहे.
संत गंगागिरीजी महाराज, वैकुंठवासी गुरुवर्य तुकाराम महाराज व पांडुरंग महाराज वैद्य यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या या सप्ताह काळात पहाटे चार ते सहा या वेळेत काकड आरती, सकाळी सात ते दहा या वेळेत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी सहा ते सात हरिपाठ व रात्री नऊ ते अकरा या वेळेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहेत. कीर्तनानंतर पंचक्रोशीतील भजनी मंडळाचा सामूहिक भजन सोहळा होणार आहे.
39 वर्षात पदार्पण करणाऱ्या या सप्ताह काळात 21 जुलै रोजी कीर्तन केसरी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचे जाहीर हरी किर्तन संपन्न झाले.तर उद्या 22 जुलै रोजी खानदेश रत्न तुकाराम महाराज जेऊरकर, 23 जुलै रोजी स्वरभास्कर बाळासाहेब महाराज रंजाळे, 24 जुलै रोजी युवा मित्र कृष्ण महाराज कमानकर, 25 जुलै रोजी वाणी भूषण गोरख महाराज कुदळ, 26 जुलै रोजी स्वर सम्राट श्यामसुंदर महाराज ढवळे, तर 27 जुलै रोजी भागवताचार्य मनसुख महाराज दहे यांची अनुक्रमे प्रत्येक दिवशी रात्री 9 ते 11 या वेळेत कीर्तन सेवा होणार आहे. तर सोमवार दिनांक 28 जुलै रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत ज्ञानेश्वर महाराज तांबे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. सप्ताह काळात कीर्तनाला साथसंगत करण्यासाठी मुरकुंदाचार्य धीरज महाराज कुऱ्हे शिंगणापूर, गायक साई महाराज कासार ,अक्षय महाराज चंद्रे व श्रीराम दरबार वारकरी शिक्षण संस्था तांदुळवाडी फाटा येथील विद्यार्थी वर्ग व सोनेवाडी पंचक्रोशीतील भजनी मंडळ साथ संगत करणार आहे. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे या अखंड हरिनाम सप्ताहाचा सोनेवाडी पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सोनेवाडी ग्रामस्थ, भजनी मंडळ व सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत