नगर विशेष प्रतिनिधी दारुच्या नशेत पोलिसांना खोटी माहिती देत दिशाभूल करणाऱ्याला कर्जत पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. जलालपूर (ता.कर्जत) येथील...
नगर विशेष प्रतिनिधी
दारुच्या नशेत पोलिसांना खोटी माहिती देत दिशाभूल करणाऱ्याला कर्जत पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. जलालपूर (ता.कर्जत) येथील दीपक भीमराव माने याच्याविरुद्ध कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता.२२) सकाळी पावणे बाराच्या सुमारास राशीन पोलीस दूरक्षेत्र येथे तात्काळ मदत पुरवणाऱ्या डायल ११२ करीता मोबाईलवरून कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या मुलाने मारहाण केली असून यात मला लागले आहे. मला तात्काळ पोलीस मदत हवी आहे. पोलीस मदत मिळाली नाही तर आत्महत्या करतो असे म्हंटल. सदरच्या व्यक्तीस मदत हवी असल्याने पोलीस कॉन्स्टेबल मनोज मुरकुटे यांनी तात्काळ त्यास पुन्हा कॉल करून घटनास्थळ कोठे आहे? असे विचारले असता सदरच्या व्यक्तीने जलालपूर (ता.कर्जत) असे सांगितले. पोलीस कॉन्स्टेबल मुरकुटे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन खात्री केली. त्यावेळी कॉल करणारा इसम दिपक भिमराव माने हा दारू पिलेला आढळून आला. त्यास कोणीही मारहाण केलेली नव्हती, असे निदर्शनास आले.
त्याने पुन्हा दोनदा डायल ११२ ला त्याच्या मोबाईलवरून दारूच्या नशेत तसाच कॉल केला. कोणतीही मारहाण झाली नसताना पोलीस प्रशासनाची दिशाभूल केली. त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल मनोज मुरकुटे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डायल ११२करा व मदत मिळवा जनतेस तात्काळ मदत मिळावी हा या प्रणालीचा मुख्य उद्देश असून ११२वर पोलीसांना खोटी माहिती देऊ नये .खोटी माहिती व दिशाभूल करणाऱ्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतात -
अंबादास हुलगे -पोलीस उपनिरीक्षक डायल ११२युनिट नियंत्रण कक्ष अहमदनगर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत