नगर : प्रतिनिधी नाभिक (न्हावी) समाजाचा पारंपारीक व्यवसाय हा दाढी आणि कटींगचा असून कोरोनानंतर तर आता दिवसाला शंभर ते दोनशे रुपयाचा सुध्दा व्...
नगर : प्रतिनिधी
नाभिक (न्हावी) समाजाचा पारंपारीक व्यवसाय हा दाढी आणि कटींगचा असून कोरोनानंतर तर आता दिवसाला शंभर ते दोनशे रुपयाचा सुध्दा व्यवसाय होत नाही. त्यामुळे हा नाभिक समाज आर्थिक परिस्थितीने अतिमागासलेला आहे. शासनाने आरक्षण न दिल्यास येणाऱ्या सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा नाभिक समाज आक्रमक पावित्रा घेण्याच्या तयारीत असून, त्यासाठी संत सेना महाराज पुण्यतिथी दिनी सोमवारी नाभिक समाजबांधवांचा मेळावा बोलाविण्यात आल्याची माहिती नाभिक समाजाचे अध्यक्ष सुजित कोरडे यांनी दिली.
कोरडे म्हणाले, नाभिक समाज हा आर्थिक परिस्थितीने अतिमागास असलेला आहे. त्यामुळे ज्या राज्यातील शासनकर्त्याना याची जाणीव झाली. त्या-त्या राज्यात नाभीक समाजाला आरक्षण देण्यात आले. आसाम, आंध्रप्रदेश, मेघालय, बिहार, उत्तरप्रदेशमध्ये अनुसूचित जाती, मध्यप्रदेश, हरियाणा, गुजरात, सिक्कीममध्ये आर्थिकदृष्ट्या अतिमागास जम्मू-कश्मीरमध्ये विशेष मागास अशा विविध राज्यात नाभिक समाजाला सवलती देण्यात आल्या आहेत. परंतु महाराष्ट्रातील शासनकर्त्याना नाभिक समाजाशी काहीच घेण-देण नसल्यामुळे १९८४ मध्ये केंद्र शासनातर्फे नाभिक समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती देण्यासंदर्भात पत्र येऊन सुध्दा येथील शासनकर्त्यानी ते पत्र केराच्या टोपलीत टाकले आहेत. महाराष्ट्रात नाभीक समाज अजूनही विना सवलतीने ओबीसी प्रवर्गातच जगत आहे. नाभिक समाजाला कोणावर अन्याय न करता अनुसूचित जातीच्या सवलती मिळण्यासाठी अनेकवेळा मोर्चे काढून शासनकर्त्याना अनुसूचित जाती सवलती मागणीचे पत्र देण्यात आले. परंतु कोणत्याही पक्षांच्या नेत्यांनी नाभिक समाजाचा विचार केला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत सत्ताधार्यांना नाभिक समाजाची ताकद दाखवून देण्यासाठी प्रसंगी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यासाठी समाज बांधव विचार करत आहेत.
त्यासाठी सोमवारी 11 रोजी राहुरीत पहिली बैठक होणार असून, प्रत्येक तालुका तालुका असे संपूर्ण राज्यात नाभिक बांधव संघटित केले जाऊन आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. तरी सोमवारी समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कोरडे यांनी केले.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत