देवळाली प्रवरा/वेबटीम:- आगामी लोकसभा,विधानसभा,स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असतांनाच देशाच्या राजकारणाबरोब...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
आगामी लोकसभा,विधानसभा,स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असतांनाच देशाच्या राजकारणाबरोबर महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत.देवळाली प्रवरा शहरात एकमेकांचे विरोधक समजले जाणारे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम व उद्योजक गणेश भांड सध्या एकत्रित येऊन आगामी काळात सहमतीचे राजकारण करण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे की काय असे गेल्या १५ दिवसांपासून दिसून येत आहे.दोघांच्या गळाभेटीने दोन्ही गटातील कार्यकर्ते कोमात गेले आहे.मात्र दोन्ही दादा सध्या जोमात असल्याचे चित्र देवळाली प्रवरा व परिसरात अनुभवयास मिळत आहे.
एकेकाळी जिवलग मित्र असलेले युवा नेते सत्यजित कदम व चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड यांच्यात सन २०१६ च्या नगरपरिषद निवडणूकित नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकित समोरासमोर लढत झाली.या लढतीत कदम यांनी विजय मिळवला तर भांड हे पराभूत झाले होते. तेव्हा पासून कदम - भांड यांना एकमेकांचे राजकीय विरोधक म्हणून शहरवासीय बघू लागले.तद्नंतर पार पडलेल्या देवळाली प्रवरा सोसायटीच्या निवडणूकितही कदम यांना शह देण्यासाठी गणेश भांड यांनी भाजप तथा कदम विरोधी नेत्यांना एकत्रित करून मोट बांधली होती.
दरम्यान सरत्या वर्षांत देवळाली प्रवरात राजकीय घडामोडी घडु लागल्या असून माजी नगराध्यक्ष कदम यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडलेल्या कार्यक्रमात उद्योजक गणेश भांड व सत्यजित कदम यांची गळाभेट झाली. याबाबतचे वृत्त सोशल मीडियावर झळकताच अनेकांच्या भुवया उंचावल्या मात्र दोन्ही गटातील कार्यकर्त्यांत संभ्रम अवस्था निर्माण होऊन 'कही खुशी कही गम' अशी परिस्थिती दिसून आली.
माजी नगराध्यक्ष कदम व उद्योजक भांड यांच्या गळाभेटीचे चित्र
दरम्यानच्या काळात दोन्ही नेत्यांच्या गळाभेटीची चर्चा संपत नाही तोच उद्योजक भांड यांच्या चैतन्य दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थिती दर्शवून तब्बल साडे ८ वर्षांनंतर या भूमीत आलो.आम्हा दोघांची मैत्री ही टिकुनच असल्याचे यावेळी कदम म्हणाले.
चैतन्य मिल्कच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यात सत्यजित कदम यांना सन्मानित करताना उद्योजक गणेश भांड
तद्नंतर देवळाली बाजारतळ येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या स्वागत कार्यक्रमात माजी आ.चंद्रशेखर कदम,माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम,उद्योजक गणेश भांड हे एकाच व्यासपीठावर दिसून आले.
एकमेकांच्या विरोधात असलेल्या दोन्ही नेत्यांचा मिलाफ होत असल्याने दुसरीकडे कदम विरोधकांनी नगरपालिका निवडणूकांना सामोरे जाण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या वेळेस भाजप कडून निवडून आलेल्या मात्र कदमांवर नाराज होऊन राष्ट्रवादीला पहिल्या पासून मानणाऱ्या नगरसेवकांनी एकत्रित येऊन गुप्त बैठका सुरू केल्या असल्याचे समजते.
एकंदरीत सत्यजित कदम व गणेश भांड यांची सहमती एक्सप्रेस सोबत धावणार का त्यांना रोखण्यात गावांतील भाजप तथा कदम विरोधी मंडळी यशस्वी ठरणार का हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
विखेंनी काय दिला कानमंत्र..!
कदम-भांड यांच्या गळाभेटीचे वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झाले दरम्यानच्या काळात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देवळाली प्रवरा शहरात आले असता त्यांनी उद्योजक भांड यांच्याशी बंदखोलीत चर्चा केली.यावेळी महसूलमंत्री विखे यांनी भांड यांना नेमकी काय कानमंत्र दिला हे मात्र समजू शकले नाही.
माजी नगरसेवकाने सुरू केली नगराध्यक्ष पदाची तयारी..!
कदम-भांड दोन्ही नेते येणार असल्याचे चित्र दिसताच तनपुरे पिता-पुत्र यांच्या जवळच्या एका माजी नगरसेवकाने नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकिसाठी तयारी सुरू केली असल्याचे समजते. देवळाली प्रवरात वास्तव्यास असलेला सदर नगरसेवक मुळता: तनपुरे घराण्याशी एकनिष्ठ आहे.मात्र गेल्या नगरपालिका निवडणूकित भाजप कडून उमेदवारी मिळवत विजय मिळविलेला सदर नगरसेवक हे कदम यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांशी कनेक्ट होऊन उमेदवारीसाठी हालचाली करत आहेत. या नगरसेवकाने कदम विरोधक मंडळींच्या भेटीगाठी घेत नियोजन सुरू केल्याचे चर्चेतून समजते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत