राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- सहल जाणार म्हणून विद्यार्थी प्रचंड आनंदित, पालकांची लगबग मात्र शाळेच्या ढिसाळ नियोजनामुळे सहल घेऊन जाणाऱ्या गाड्या...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
सहल जाणार म्हणून विद्यार्थी प्रचंड आनंदित, पालकांची लगबग मात्र शाळेच्या ढिसाळ नियोजनामुळे सहल घेऊन जाणाऱ्या गाड्या पूर्ण रात्रभर न आल्याने निराश होऊन विद्यार्थ्यांना घरची वाट धरावी लागली. आशेला लागलेल्या विद्यार्थ्यांची सहल गेली नाहीच पण विद्यार्थ्यांसह पालकांना भर थँडीत रात्र जागून काढण्याची वेळ आली. ही घटना राहुरी फॅक्टरी येथील एका शाखेच्या बाबतीत घडली असून पालकांनी प्राचार्य व शिक्षकांवर चांगलेच तोंडसुख घेऊन खडेबोल सुनावले आहे.
राहुरी फॅक्टरी येथील एका शाळेची शैक्षणिक सहल काढण्याचा निर्णय प्राचार्य महोदयांनी घेतला. त्यानुसार विद्यार्थ्यांकडून प्रवास , जेवण व निवास याबाबत ठराविक रक्कम ठरली. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना याबाबत सांगितले. त्यानुसार पालकांनी विद्यार्थ्यांना परवानगी देत ठरलेली रक्कम शाळेकडे जमा केली.
गुरुवारी रात्री सहल निघणार असे ठरले.. ठरलेल्या वेळात पालक विद्यार्थ्यांना सर्वतयारी निशी घेऊन आले. अर्धा तास झाला..एक तास झाला.. दोन तास झाले.. पण विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसेस मात्र काही आल्या नाही. सदर ट्रॅव्हल मालकाला मुख्याध्यापक व बस ठरविणारे शिक्षक संपर्क करत असताना गाड्या पोहोचतील काळजी करू नका असा शब्द देत होता. रात्र निघून चालली पण बस काही आल्या नाहीच.. हे कसल नियोजन, रातभर थँडीत आम्ही व आमच्या मुलांनी करायचं अस म्हणून पालकांनी आक्रमक होत शाळेचे प्राचार्य व शिक्षकांवर चांगलंच तोंड सुख घेतल. वाड्यावस्त्यांवरचे पालक विद्यार्थ्यांना सोडून घरी गेले होते. त्यांना याची काही कल्पना नव्हती.
सहल रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना निराश पावलांनी घरी परतावे लागलं .काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.
शुक्रवारी सकाळी तातडीने पालक मेळावा घेण्यात आला. यावेळी काही पालकांनी पुन्हा एकदा प्राचार्य व शिक्षक धारेवर धरले, आमचे पैसे द्या बाकी बोलूच नका अशी भूमिका घेतली. सहलीसाठी जमा केलेली रक्कम शाळेने प्रामाणिकपणे सर्वांना परत केली. मात्र यावेळी पालकांनी शाळेबाबत मागच पुढच सगळंच उरकून काढत मुख्याध्यापक व शिक्षकांचे चांगलेच कान उपटले..
दरम्यान राहुरी फॅक्टरी येथील या शाळेच्या ढिसाळ नियोजनाबद्दल पालक वर्गातून मोठी चीड व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे आमची सहल जाणार या आनंदात असलेले विद्यार्थी हिरमुसलेले पहावयास मिळाले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत