राहुरी(वेबटीम) राहुरीचे पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी ५ वर्षात १२ अधिकारी झालेत. वेगवेगळ्या कारणाने अधिकाऱ्यांची बदली होत असून पूर्ण ...
राहुरी(वेबटीम)
राहुरीचे पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी ५ वर्षात १२ अधिकारी झालेत. वेगवेगळ्या कारणाने अधिकाऱ्यांची बदली होत असून पूर्ण कालावधी अधिकारी टिकत नसल्याने गुन्हेगारी चांगलीच फावत आहे. राहुरीला दोन दिवसात नवा पोलिस निरीक्षक मिळणार असून निलंबित झालेल्या तहसीलदार राजपूत यांच्या जागेवर नवीन तहसीलदार हजर होणार आहेत. मात्र वाढलेली गुन्हेगारी व बोकावलेली अवैध गौण खनिज याला आळा घालणारे पोलीस निरीक्षक व तहसीलदार मिळणे अपेक्षित आहे,अन्यथा राहुरीत पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होणार आहे.
राहुरी तालुक्यातील उंबरे येथील राष्ट्रीय बालहक्क चौकशीवरून पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना अहमदनगर कंट्रोलला बदली करण्यात आली.त्यानंतर त्यांना नेवासा पोलीस ठाण्याचे जबाबदारी देण्यात आली. याचवेळी सायबरचा कारभार बघणारे संजय सोनवणे यांना राहुरीचा तात्पुरता स्वरूपात चार्ज देण्यात आला. धनंजय जाधव राहुरीत असताना अवघ्या काही महिन्यांत त्यांनी गुन्हेगारीवर चांगला वचक निर्माण केला होता. गावोगावी शाळेत जाऊन विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्यात केलेली जनजागृती, पोलीस ठाण्यात कर्मचारी यांच्या कामातील सुसूत्रता, सामान्य नागरीकांशी सरळ संवाद यामुळे धनंजय जाधव यांनी राहुरी तालुक्यात आपल्या कामांमुळे चांगलीच छाप पाडली होती. मात्र जाधव यांची बदली झाल्याने राहुरीत गुन्हेगारी पुन्हा फोफावली. उंबरे प्रकरणात पोलीस निरीक्षक जाधव यांचा हाकनाक बळी गेल्याचे बोलले जात आहेत.सध्याचे पीआय संजय सोनवणे यांना कामाचा ठसा उमटविता आला नाही. गुन्हेगारी वाढलेले प्रमाण, कर्मचाऱ्यांतील हेवेदावे पहावयास मिळत आहे. त्यामुळे राहुरीला धनंजय जाधव यांना पुन्हा संधी द्या अशी मागणी जोर धरू लागली.
जिल्ह्यात सध्या १० पोलीस निरीक्षक नंदुरबार, धुळे, जळगाव व नाशिक येथून दाखल झाले आहेत. त्यांनी राहुरी मिळावी म्हणून तर जिल्ह्यात अन्य ठिकाणी काम केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावली आहे. मात्र ज्याचे जास्त 'वजन' तोच राहुरीचा पोलीस निरीक्षक याप्रमाणे ही नियुक्ती होणार आहे. दोन दिवसात याबाबत नियुक्ती होणे अपेक्षित आहे.
दुसरीकडे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांना निलंबित करण्यात आल्याने महसूल कारभार वाऱ्यावर आहे. अवैध गौण खनिज उत्खनन दिवस रात्र सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी चिंचविहिरे हद्दीत अवैध मुरूम उत्तखन करणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने तरुणाला अपंगत्व आले. तहसीलदार चंद्रजित राजपुत यांचा ८ महिन्यातील कारभार वादग्रस्त ठरला आहे. त्यामुळे आता राहुरीला नवीन तहसीलदार मिळणार असून ती नियुक्ती येत्या आठवड्यात होणार आहे.
राहुरी तालुक्यात कर्तव्यदक्ष तहसीलदार व खमक्या पोलीस निरीक्षकाची नितांत गरज आहे. यापूर्वीचे तहसीलदार फसीयोद्दीन शेख तसेच पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, प्रताप दराडे, मेघशाम डांगे, धनंजय जाधव यांच्या कार्यपद्धती विषयी राहुरी तालुक्यात चांगली चर्चा होती.
राहुरीत येत्या आठवड्यात नवीन तहसीलदार व नवीन पोलीस निरीक्षक बसणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत