राहुरी(वेबटीम) त्यांनी संकल्प केला. स्वखर्चाने १०८ जणांना तीर्थाटन घडवायचे. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेला न्यायचे. नर्मदाकाठी सर्व...
राहुरी(वेबटीम)
त्यांनी संकल्प केला. स्वखर्चाने १०८ जणांना तीर्थाटन घडवायचे. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेला न्यायचे. नर्मदाकाठी सर्वांच्या हस्ते होम-हवन करायचे. नर्मदा स्नान, पायी परिक्रमेचे पुण्यफळ द्यायचे. स्वकष्टार्जित सुवर्ण दान सर्वांच्या हस्ते नर्मदा मैयाला अर्पण करायचे. त्यांची संकल्पपूर्ती नुकतीच झाली. विविध जातीधर्माच्या नर्मदा भक्तांची मंत्रोच्चारात दानधर्मासह नि:शुल्क परिक्रमा घडली.
गुहा (ता.राहुरी) येथील ग्रामाचार्य व नर्मदा भक्त सोमनाथ कुलकर्णी व सीमा कुलकर्णी असे संकल्पपूर्ती केलेल्या दानशूर दांपत्याचे नांव आहे. उत्तर वाहिनी पायी नर्मदा परिक्रमा फक्त चैत्र महिन्यात केली जाते. सध्या बारा कुंभमेळ्यांचे फळ देणारे पुष्कर पर्व चालू आहे. बारा दिवसांच्या या पर्वामध्ये नर्मदा काठी स्नान, दान, उपासना यांचे पुण्यफळ १०८ पट असते.
स्कंद पुराणातील नर्मदा प्रकरणात नर्मदा उत्तर वाहिनी परिक्रमेचे महत्त्व सांगितले आहे. प्रदोष पर्व, अमावस्या पर्व, सोमवार, पुष्कर पर्व, कुबेर यात्रा अशा अनेकविध पर्वांचा संगम असलेल्या काळात कुलकर्णी दांपत्याने नर्मदा भक्तांची परिक्रमा कपिलाषष्ठीच्या सुवर्ण योगासारखी घडवून आणली.
गुहा येथून सोमवारी (ता. ६) भल्या पहाटे दोन लक्झरी बस, एक चारचाकी वाहनासह वेदशास्त्र संपन्न २१ ब्राह्मण व ग्रामस्थ महिला-पुरुषांचा ताफा रवाना झाला. सर्वतीर्थ, जटायू मोक्षस्थान (टाकेद), संत गजानन महाराज यांची तपोभूमी (कपिलधारा), श्री संत निवृत्तीनाथ समाधी (त्र्यंबकेश्वर), नाशिक, सप्तशृंगी देवी, सापुतारा, उनई माता, रामपुरा व उत्तर वाहिनी परिक्रमेचे तिलकवाडा क्षेत्रातील सर्व नर्मदा किनारी असणाऱ्या क्षेत्रांचे दर्शन घेतले.
श्रीरंग अवधूत स्वामींचे समाधी स्थान, मातृ मंदिर (नारेश्वर), श्रीदत्त क्षेत्र (भालोद), श्री टेंबे स्वामी समाधी स्थान (गरुडेश्वर), कुबेर धाम, नीलकंठ धाम दर्शनाने नर्मदा भक्तांचे पारणे फिटले.
सुवर्ण दानाची संकल्पपूर्ती.
गरुडेश्वर येथे नर्मदा स्नान, नर्मदा मैयाची ओटी, संकल्प पूजा करून सोमनाथ (गुरु) व सीमा कुलकर्णी या दांपत्याने सर्वांच्या हाती लाखो रुपयांचे स्वकष्टार्जित सुवर्ण नर्मदेत विसर्जनाला दिले. नर्मदा भक्तांच्या हस्ते सुवर्णदानाचा संकल्प पूर्ण केला.
होम-हवनाने सांगता..!
अमावस्या पर्व काळातील नर्मदा स्नान, नर्मदाकाठी श्री पराग शास्त्री, विनायक गुरुजी, महादेव गुरुजी, श्रीपाद गुरुजी, सोहम कुलकर्णी आदींसह २१ ब्राह्मणांनी केलेले होम-हवन, भजन, संकेत शास्त्री यांचे काल्याचे कीर्तनाने परिक्रमेची सांगता झाली.
पर्यटनाचा आनंद :
सरदार वल्लभभाई पटेल यांची स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार सरोवर परिसरातील जंगल सफारी, सायंकाळचा लेझर शो असा पर्यटनाचा आनंद नर्मदा भक्तांनी घेतला. तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्राची धार्मिक, पौराणिक माहिती कुलकर्णी गुरुजींनी सर्वांना दिली.
लाख मोलाचा दाता :
गुहाचे ग्रामपुरोहित सोमनाथ कुलकर्णी यांनी यापूर्वी धोंड्याच्या महिन्यात सर्व जाती-धर्माच्या ग्रामस्थांना जावयाचा मान देऊन मिष्ठान्न भोजन दिले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत