राहुरी/वेबटीम:- भाडोत्री घेतलेल्या खोलीमध्ये गुटखा ठेवण्यास मज्जाव केल्याने चार जणांनी मिळून एका ज्येष्ठ पत्रकाराला शिवीगाळ करुन दगड, फायट...
राहुरी/वेबटीम:-
भाडोत्री घेतलेल्या खोलीमध्ये गुटखा ठेवण्यास मज्जाव केल्याने चार जणांनी मिळून एका ज्येष्ठ पत्रकाराला शिवीगाळ करुन दगड, फायटर व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना आज दि. १६ जूलै २०२४ रोजी सकाळच्या दरम्यान राहुरी तालूक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली.
राहुरी तालूक्यात राजरोसपणे गुटखा विक्री सुरु आहे. अल्प काळात गुटखा किंग म्हणून नावारूपास आलेल्या राहुरी तालूक्यातील राहुरी खुर्द येथील पवन गिरासे हा संपूर्ण राहुरी तालूक्यात राजरोसपणे गुटखा विक्री करत आहे. यापूर्वी त्याच्यावर गुटखा विक्रीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र काही पोलिस कर्मचाऱ्यांना हाथाशी धरुन त्याचा गुटखा विक्रीचा व्यवसाय राजरोसपणे चालू असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. पवन गिरासे याने चार दिवसांपूर्वी राहुरी खुर्द येथील शिवनेरी काॅलनी येथील ज्येष्ठ पत्रकार उत्तम आप्पासाहेब गाडे यांचे नातेवाईक प्रसाद बलभिम डोके यांची खोली राहण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतली होती. मात्र त्या खोलीमध्ये त्याने अनाधिकृतपणे गुटखा ठेवण्यास चालू केले. आज दि. १६ जूलै २०२४ रोजी सकाळी साडेनऊ वाजे दरम्यान उत्तम गाडे यांनी पवन गिरासे याला सदर खोलीमध्ये गुटखा ठेवण्यास मज्जाव केला. त्यावेळी पवन गिरासे व इतर आरोपींनी मिळून उत्तम गाडे यांना शिवीगाळ करुन दगड, फायटर व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच आम्ही येथेच राहणार आहोत, तुम्ही आम्हाला परत काही विचारले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
या घटनेत ज्येष्ठ पत्रकार उत्तम आप्पासाहेब गाडे, वय ६९ वर्षे, रा. शिवनेरी कॉलनी, राहुरी खुर्द, ता. राहुरी, हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पवन दगडूसिंग गिरासे, दगडूसिंग गिरासे व दोन अनोळखी इसम अशा चार जणांवर गून्हा रजि. नं. ८१९/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३५१ (३) प्रमाणे मारहाण करून धमकी दिल्याचा गून्हा दाखल करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत