राहुरी फॅक्टरी(वेबटीम) नगर मनमाड रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असून पावसाने हा रस्त्यावर पूर्णपणे खड्डे पडले असून खड्ड्यात पाणी साचत आह...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
नगर मनमाड रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असून पावसाने हा रस्त्यावर पूर्णपणे खड्डे पडले असून खड्ड्यात पाणी साचत आहे.अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यांचे काम व्हावे व या रस्त्यावरील अवजडवाहतूक अन्य रस्त्यावरून वळवावी अन्यथा १ सप्टेंबर पासून राहुरी येथील मूळा नदीवरील पुलावर बेमुदत रास्ता रोको आंदोलन करू असा एकमुखी इशारा नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समिती व सामाजिक संघटनांनी दिला आहे.
राहुरी कारखाना येथे नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी आजी-माजी खासदार, आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, समाजसेवक व विविध राजकीय पक्षांनी उपस्थित रहावे असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले होते. या आवाहनास प्रतिसाद देत अनेकांनी बैठकीस हजेरी लावली.अनेकांनी आपली मते मांडली.
कृती निर्णय घेईल त्या निर्णया सोबत राहू, कृती समितीच्या लढ्यामुळे महामार्गाचे आंदोलन देशात पोहोचल्याचे , तर केंद्रीय मंत्री यांची भेट घेण्यासाठी नागपूरला समितीच्या सदस्यांना घेवून जाण्यासाठी हवी ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी अनेकांनी दिले.महामार्गाच्या आंदोलना मध्ये कोणीही राजकारण न आणता सर्व सामान्यांचा लढा म्हणून सहभाग नोंदवावा.कृती समितीच्या सदस्यांना वरिष्ठ मंत्र्यांची भेट घ्यायची असल्यास नियोजन करण्यात येईल असेही विषय चर्चेत आला.
या बैठकीत नगर मनमाड महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तो पर्यंत महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात यावी कारण अवजड वाहतुकीमुळे महामार्गावरील बुजवलेले खड्डे पुन्हा तयार होतात.झालेल्या खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात घडत आहेत.कोल्हार ते नगर रोज अनेक तरुण नगर एमआयडीसी कामानिमित्त जात असतात.या खड्ड्यांमुळे शेकडो तरुणांचे व पप्रवाशांचे प्राण गेलेले आहेत.त्यामुळे नगर मनमाड महामार्गाच्या दोन्ही बाजूचा एक रस्ता दुरुस्त करावा व जो पर्यंत महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत नाही तो पर्यंत अवजड वाहतूक बंद करण्यात यावी.मागणी मान्य न झाल्यास दि.१ सप्टेंबर २०२४ रोजी नगर मनमाड महामार्ग जोडणाऱ्या राहुरी येथील मुळा नदीवरील पुलावर बेमुदत रस्ता बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
दरम्यान जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ हे नगर मनमाड महामार्गावरून जात असतना रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या सदस्यांनी राहुरी कारखाना येथे थांबवत नगर-मनमाड महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याबाबत पत्र दिले तसेच महामार्गावरील आत्तापर्यंत झालेल्या अपघातांमुळे शेकडो कुटुंब उध्वस्त झाल्याचे निदर्शनास आणून दिले.
कृती समितीने रोडप्रश्नी बोलावलेल्या बैठकीतील प्रमुख मुद्दे व आंदोलनाची पुढील दिशा
▶️1) सोशल मीडियाद्वारे सर्वात प्रथम रोडप्रश्नी होणाऱ्या प्रत्येक घडामोडी प्रसारित करणे
▶️2) शिर्डी ते नगर या दरम्यान असलेल्या मोठ्या गावात फ्लेक्स द्वारे रोडच्या परिस्थितीतीची व सामान्य नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याची विनंती करणे
▶️3) जास्तीत जास्त नागरिकांना या रोडप्रश्नी चालू असलेल्या आंदोलनाची माहिती देणे
▶️4) जर प्रशासनाने जड वाहतूक व रोडवरील खड्डे 30 ऑगस्ट पर्यंत न बुजवल्यास रविवार दि 1 सप्टेंबर 2024 रोजी राहुरी येथे होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनात हजारोंच्या संख्येने सामील होणे
▶️5) नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना निवेदन देणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत