श्रीरामपूर (प्रतिनिधी) कित्येक दशके निवडणूका आल्या कि जिल्हा विभाजन प्रश्नाचा आव आणायचा. आणि निवडणुका जिंकल्या कि, जिल्हा विभाजन प्रेमींची ...
श्रीरामपूर (प्रतिनिधी)
कित्येक दशके निवडणूका आल्या कि जिल्हा विभाजन प्रश्नाचा आव आणायचा. आणि निवडणुका जिंकल्या कि, जिल्हा विभाजन प्रेमींची प्रतारणा केली जाते. या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीच्या नियोजनबद्ध चळवळीने जिल्हा विभाजन चळवळ अंतिम टप्या गाठला आहे. श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी घेतलेल्या भूमिकेचे संघर्ष समितीने स्वागत केले आहे. मात्र जिल्हा विभाजन मागणी शासनाचे गांभीर्याने घ्यावा. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी श्रीरामपूर जिल्हा जाहिर करावा. या सामाजिक प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (14) सकाळी 10.00 वाजता बेलापूर झेंडा चौक ते श्रीरामपूर प्रांत कार्यालय लॉंग मार्च निघणार आहे. यामध्ये प्रत्येक क्रांतिकारी श्रीरामपूरकरांनी लोकसहभाग नोंदवून इतिहासाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी केले आहे.
श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीने प्रांत कार्यालयात ठिय्या आंदोलन करत 15 ऑगस्टचा अल्टीमेटम दिला होता. श्रीरामपूर जिल्हा नाहीतर मतदान नाही या भूमिकेवर क्रांतिकारी श्रीरामपूरकर शेवटपर्यंत ठाम राहणार आहे. संघर्ष समितीच्या आक्रमक भूमिकेमुळे म्हणा किंवा योगायोगाने म्हणा ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन श्रीरामपूर दौऱ्यावर आले. त्यांनी नुकतेच श्रीरामपूरमध्ये श्रीरामपूर जिल्हा विषय कॅबिनेटच्या मंत्री मंडळामध्ये मांडण्याची भूमिका अधोरेखित केली आहे. मंत्री महाजन यांनी स्पष्ट शब्द दिल्याने जिल्हा विभाजनाची कोंडी सुटू लागली आहे.
साधारण दोनशे वर्ष दरम्यान आशिया खंडातील पहिली औद्योगिक क्रांती श्रीरामपूर शहरालगत झाली आहे. मात्र आजची श्रीरामपूरची बाजारपेठेची वाताहत डोळ्याला पहावत नाही. श्रीरामपूर जिल्हा झाला नाहीतर तालुक्याचे वाळवंट होणार आहे. यामुळे तरुण पिढी दिशाहीन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संघर्ष समिती श्रीरामपूर जिल्हा होईपर्यंत कटीबद्ध राहणार आहे. श्रीरामपूर जिल्ह्याची अधिसूचना निघेपर्यंत जनआंदोलने चालूच ठेवणार आहे.
गेली बेचाळीस- त्रेचाळीस वर्षापासून श्रीरामपूर जिल्हा मागणीचा गुंता एकदाचा सुटावा अशी प्रत्येक नागरिकांची प्रामाणिक भावना आहे. आता क्रांतिकारी श्रीरामपूरकरांची सहनशीलता संपत चालली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या कमी खर्च येणारा श्रीरामपूर जिल्हा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला शासनाने विनाअट घोषित करावा, यासाठीचे निवेदन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष लकी सेठी अशोक बागुल विजय नगरकर कुणाल करंडे विधीज्ञ बाबा शेख चरणदादा त्रिभुवन रवि गरेला मनोज हासे राजेंद्र गोरे माणिकराव जाधव वसंत शेटे दर्शन विजन अनिस पठाण तौफिक शेख हाजी फय्याज बागवान विशाल साबद्रा उपस्थित होते.
चाळीस वर्षांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री पदावर असतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी सोनई येथे सहकार परिषदेत श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा देखील केली होती. त्यानंतर जिल्ह्याचे मुख्यालय तर कधी श्रेयवादाचे लढाईत श्रीरामपूरकरांच्या प्रगतीला खीळ बसली. आणि साहजिकच श्रीरामपूर जिल्हा होण्यापासून वंचित राहिला. या पार्श्वभूमीवर योगायोगाने मध्यंतरी अकोले येथे श्रीरामपूरच जिल्हा होण्यावर ठाम राहण्यासाठी सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांची देखील राजेंद्र लांडगे यांनी भेट घेऊन निवेदन दिले आहे.
माजी मुख्यमंत्री स्व.ए.आर. अंतूले यांनी देखील श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी प्रयत्न केले होते. महाविकास आघाडीचे तत्कालीन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना श्रीरामपूर जिल्हा करण्यास पुरेसा कालावधी मिळाला नाही. महायुतीचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील श्रीरामपूर जिल्हा होण्यास वेळोवेळी सकारात्मकता दाखविली आहे.
गतिमान आणि धाडसी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार देखील श्रीरामपूर जिल्हा करून राजकारणात स्थिरता प्राप्त करतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शासनाच्या निकषाच्या आधारे आणि प्रभू श्रीरामचंद्राचे नावाने पुनीत झालेला श्रीरामपूर जिल्हा सर्वार्थाने योग्य आहे. प्रभू श्रीरामचंद्राला देखील अनेकदा साकडे घातले आहे.एकंदरीत शासन २२ जिल्हेसह ४८ तालुक्यांची निर्मिती करण्याचे तयारीला लागले आहे.
शासनाने कमी खर्च येणारा श्रीरामपूर जिल्हा 15 ऑगस्ट, 2024 ला घोषित न केल्यास सावधगिरी म्हणून श्रीरामपूर जिल्हा नाही तर मतदान नाही असे अभियान संघर्ष समिती संपूर्ण जिल्हाभर राबविण्यावर ठाम राहणार आहे.श्रीरामपूर जिल्हा चळवळ यशस्वी होण्यासाठी क्रांतिकारी श्रीरामपूरकरांसह मोठ्या संख्येने सर्व पक्षीय राज्यकर्ते, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्व पक्षीय पदाधिकारी, सर्व जाती धर्मांचे धर्मगुरु, ज्येष्ठ नागरिक संघटना, विविध क्षेत्रातील उद्योजक, वकील संघटना, पत्रकार संघटना, विविध शेतकरी संघटना, वैद्यकीय संघटना, सामाजिक सेवाभावी संघटना, विविध मंडळे, विविध कामगार संघटना, व्यापारी संघटना, विद्यार्थी संघटना, साहित्यिकांची संघटना, विविध क्षेत्रातील कलावंत यांनी बुधवार (14) सकाळी 10.00 वाजता बेलापूर झेंडा चौक ते श्रीरामपूर प्रांत कार्यालय लॉंग मार्चमध्ये लोकसहभाग नोंदवावा. तसेच प्रत्येक ग्रामसभेत शासनाचे अभिनंदनपर ठराव करावेत असेहि आवाहन राजेंद्र लांडगे यांनी शेवटी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत