राहुरी(वेबटीम) राहुरी तालूक्यातील आरडगाव परिसरात वाळू चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठी यांच्या चारचाकी वाहनाला ट्रॅक्टरने...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालूक्यातील आरडगाव परिसरात वाळू चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठी यांच्या चारचाकी वाहनाला ट्रॅक्टरने धडक देऊन आरोपी ट्रॅक्टर घेऊन पसार झाल्याची घटना दि. १९ जून २०२४ रोजी घडली होती यातील आरोपी तांदुळवाडी ग्रा.पं.सदस्य विक्रम पर्वतीशंकर पेरणे यास राहुरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
बाबासाहेब रामजी पंडीत, वय ४७ वर्षे, हे राहुरी येथे कामगार तलाठी म्हणून काम पाहतात. दि. १९ जून २०२४ रोजी रात्री ११.३० वाजे दरम्यान तहसीलदार नामदेव पाटील यांच्या आदेशावरून बाबासाहेब पंडित व कोतवाल योगेश पुंजाहरी झुगे हे चारचाकी वाहनातून तालूक्यातील आरडगाव येथे चोरटी वाळू वाहतूकीवर कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना एक निळ्या रंगाचा ट्रॅक्टर व वाळूने भरलेली ट्रॉली आरडगांव कडुन रोडने आल्याचे दिसले. तेव्हा तलाठी बाबासाहेब पंडित यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने ट्रॅक्टर थांबवला नाही. तेव्हा तलाठी बाबासाहेब पंडित यांनी चारचाकी वाहनातून त्या ट्रॅक्टरचा पाठलाग केला. तेव्हा ट्रॅक्टर चालकाने तलाठी बाबासाहेब पंडित यांच्या चारचाकी वाहनाला धडक देऊन तो ट्रॅक्टर घेऊन पसार झाला.
तलाठी बाबासाहेब रामजी पंडीत यांच्या फिर्यादीवरून आरोपी विक्रम पर्वतीशंकर पेरणे, रा. तांदुळवाडी, ता. राहुरी, याच्यावर गून्हा रजि. नं. ७३२/२०२४ भादंवि कलम ३५३, ३७९, ४२७ प्रमाणे वाळू चोरी व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गून्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. आज दि.२० ऑगस्ट रोजी राहुरी स्टेशन रोड, नाका नं.५ येथे आरोपी ग्रा.पं. सदस्य विक्रम पर्वतीशंकर पेरणे यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी बडे हे करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत