श्रीरामपूरचा राजा माणूस- स्व. अनिल(बाबासाहेब) कांबळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपूरचा राजा माणूस- स्व. अनिल(बाबासाहेब) कांबळे

श्रीरामपूर  शहरातील व ग्रामीण भागातील सर्व समाज बांधवांशी जवळचे संबंध असलेले सर्वगुण संपन्न आणि सहृदयी मनाचा माणूस माजी नगराध्यक्ष अनिल शामर...

श्रीरामपूर 



शहरातील व ग्रामीण भागातील सर्व समाज बांधवांशी जवळचे संबंध असलेले सर्वगुण संपन्न आणि सहृदयी मनाचा माणूस माजी नगराध्यक्ष अनिल शामराव कांबळे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. श्रीरामपूर शहराच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असलेले माजी नगराध्यक्ष स्व. शामराव कांबळे यांचे सुपुत्र तर धडाडीच्या माजी नगरसेविका भारतीताई कांबळे यांचे पती तसेच कुणाल कांबळे यांचे वडील अनिलराव कांबळे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बाबासाहेब यांचे निधन दि. ४ डिसेंबर रोजी झाले. त्यांचा जन्मदिवसही त्याच दिवशी होता, हा एक योगायोग म्हणावा लागेल.


शहरातील हॉटेल गुलमोहर व मेडिकल व्यावसायिक म्हणून सामाजिक, आध्यात्मिक व राजकीय क्षेत्रात अतिशय धुरंदर असलेले व्यक्तिमत्व म्हणून अनिलराव कांबळे यांची सर्वत्र ओळख होती. महाविद्यालयीन जीवनापासूनच तडफदार व डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून 'बाबासाहेब' या टोपण नावाने परिचित असलेले अनिलराव कांबळे यांची युथ पॉवर ऑर्गनायझेशन, श्रीरामपूर या संघटनेच्या माध्यमातून स्व. आमदार जयंतराव ससाणे यांच्यासह राजकीय व सामाजिक कार्यास सुरुवात झाली. बँकिंग क्षेत्रात नामांकीत असलेल्या श्रीरामपूर पिपल्स बँकेचे सन १९८४ ते १९९७ पर्यंत सलग संचालकपद त्यांनी भुषवले. तर सन १९९८ ते २००४ पर्यंत चेअरमन पदाची धुराही त्यांनी सांभाळली. त्यांच्या काळात या बँकेत संगणक सुविधा व बँकेचे नुतनीकरण करून अद्ययावत बँक निर्माण करण्यात आली. या बँकेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना मदतीचा आधार दिला जात होता. त्याचबरोबर श्रीरामपूर मर्चेंट असोसिएशनचे तीन वेळ संचालकपद व अध्यक्षपद त्यांनी भूषविले. शहरातील व्यापार, उद्योग, छोट्या-मोठ्या व्यवसायाला चालना मिळावी, यासाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न केले. श्रीरामपूर नगरपरिषदेचे २५ वर्षे नगरसेवक राहण्याचा बहुमान त्यांनी मिळवला. त्याचबरोबर सन १९९० ते १९९१ या कालावधीत नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. याकाळात त्यांनी शहरातील विविध विकास कामे त्याचबरोबर योजना व प्रकल्पांची उभारणी करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला.


सामाजिक विधायक व राजकीय कामामुळे शहरातील व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्या पाठीशी होती. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांच्या व मित्र परिवाराच्या आग्रहाखातर सन १९९६ मध्ये अपक्ष तर सन २००१ मध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. त्यावेळी अतिशय कमी मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यांनी तीन तालुक्यांशी निगडित असलेल्या मुळा-प्रवरा वीज संस्थेचे १५ वर्षे संचालकपद भूषवले होते. त्याचबरोबर श्रीरामपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन १९९० ते १९९३ यादरम्यान पदसिद्ध संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. राजकीय व सामाजिक क्षेत्रात असलेल्या सर्वांशी त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. स्पष्ट वक्ता म्हणून त्यांची ख्याती होती. राजकीय जीवनाबरोबरच त्यांचे आध्यात्मिक क्षेत्रातही मोठे काम होते. त्यांच्या संकल्पनेतून कांदा मार्केट परिसरातील कौशल्यानगर येथे पालिकेच्या खुल्या जागेत श्री साईबाबा मंदिराची उभारणी करण्यात आली. त्याठिकाणी विविध धार्मिक व विधायक उपक्रम राबविले जातात. तसेच सुभाष कॉलनी मधील श्री हनुमान मंदिराचा सन २००२ मध्ये जीर्णोद्धार त्यांच्या पुढाकारांने करण्यात आला. स्व. अनिलराव कांबळे यांच्या निधनाने श्रीरामपूर शहराची मोठी हानी झाली आहे. एक उमदे नेतृत्व हरपल्याने राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, व्यावसायिक उद्योजक व व्यापारी वर्गातून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी भारतीताई, मुलगा कुणाल त्याचबरोबर चार भाऊ, तीन बहिणी, भावजयी, पुतणे असा मोठा परिवार आहे. बाबासाहेब यांचा आज दशक्रियाविधी असून त्यांना त्यानिमित्ताने भावपूर्ण आदरांजली !


शब्दांकन - सुरेश कांगुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत