श्रीरामपुर(वेबटीम) युवा मतदार हा भारतीय लोकशाहीचा कणा आहे. त्यामुळे वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येकाने मतदार नोंदणी करून निवडणुकीत ...
श्रीरामपुर(वेबटीम)
युवा मतदार हा भारतीय लोकशाहीचा कणा आहे. त्यामुळे वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येकाने मतदार नोंदणी करून निवडणुकीत मतदान करावे व इतरांनाही प्रोत्साहित करावे. सातत्याने जनजागृती केल्याने व मतदारसंघातील सर्वांच्या सहकार्याने झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७० टक्के पेक्षा अधिक मतदान होऊ शकले. या पुढील निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन प्रांताधिकारी किरण सावंत यांनी केले आहे.
येथील बोरावके महाविद्यालयात १५व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त युवकांशी संवाद साधताना बोलत ते होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. व्ही. बडधे होते. यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, पत्रकार नवनाथ कुताळ, प्रा. डॉ.सुनिता गायकवाड, दत्तात्रय साबळे, सुनील साळवे, प्राचार्या पूनम बोधक, प्रा. सुनील देवकर, पोस्ट मास्तर सागर आढाव, निवडणूक विभागाचे महसूल सहायक ओम खुपसे, संदीप पाळंदे, प्रितेश तांदळे, विपुल गागरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रांताधिकारी सावंत म्हणालेकी, लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सहभाग महत्त्वाचा असून मतदान करणे आवश्यक आहे. नवमतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मतदार म्हणून नोंदणी करावी. विधानसभा निवडणुकीत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानवाढ करण्यात यश आले. स्वीप उपक्रमांचे यात मोलाचे योगदान आहे. नागरिक, विविध संस्था, महाविद्यालये आणि शाळांनी सहकार्य केल्याने हे यश संपादन करता आले. यापुढेही सर्वांनी मतदार जागृती उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्याच्या स्वीप उपक्रमात झालेला सन्मान हा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मतदार नोंदणी करण्यात विशेष कामगिरी करणाऱ्या बी.एल.ओ., निवडणूक अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन स्विप नोडल अधिकारी गणेश पिंगळे यांनी केले आहे. तर आभार डॉ. भागवत शिंदे यांनी मानले. यावेळी उपस्थितांना व नवमतदारांना मतदानाची शपथ शपथ देण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत