राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरीकरांसाठी एप्रिल महिना हा हरिनामाची मोठी पर्वणी ठरणार आहे.तब्बल ५ ते ६ हरिनाम सप्ताह या महिन्यात पार पड...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरीकरांसाठी एप्रिल महिना हा हरिनामाची मोठी पर्वणी ठरणार आहे.तब्बल ५ ते ६ हरिनाम सप्ताह या महिन्यात पार पडणार आहेत. दररोज किर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राहुरी फॅक्टरी पासून नजीकच असलेल्या चिंचविहिरे हद्दीतील श्रीराम व सिद्धेश्वर देवस्थान अर्थात रामदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी उत्सव सोहळ्या निमित्ताने ३० मार्च ते ६ एप्रिल दरम्यान श्रीराम चरित्र मानस पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.६ एप्रिल रोजी साई महाराज जाधव यांच्या प्रवचनाने व महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.
राहुरी फॅक्टरी येथील बैलगाडी गुंजाळ मळा येथील शनी मंदिर व हनुमान मंदिरात ५ ते ११ एप्रिल दरम्यान पारायण सोहळा आयोजित केला असून या निमित्ताने दररोज रात्री महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार व त्यानंतर महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान ५ ते १२ एप्रिल या कालावधीत राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर येथे भव्य दिव्य सप्ताहचे नियोजन करण्यात आले आहे या ठिकाणीही कीर्तन व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच शांती चौक मित्र मंडळ येथे सालाबाद प्रमाणे यंदाही ७ ते १४ एप्रिल या कालावधीत साई चरित्र पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने कीर्तन व महाप्रसाद आदि कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तर १८ ते २५ एप्रिल या दरम्यान ताहाराबाद देवस्थानचा संत कवी महिपती महाराजांचा फिरता नारळी सप्ताह क्लब हाऊस प्रांगणात होणार आहे. यानिमित्ताने दररोज सकाळी व सायंकाळी किर्तन त्याचप्रमाणे दुपारी व रात्री महाप्रसाद पंगत नियोजन आहे. राहुरी तालुक्यातील प्रत्येक गावातून भाकरी चपाती पंगतीचे नियोजन आहे.भव्य दिव्य मंडप उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे.
वरील सप्ताहांबरोबरच ठिकठिकाणी श्रीराम नवमी, हनुमान जयंती , महावीर जयंती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत